येवला : शहराला साठवण तलावातील मृत साठ्यातून पाणीपुरवठा सुरू झाला असून, तलावाचा तळ उघडा पडला आहे. केवळ ८ जुलैपर्यंत पाणी पुरणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. आता फक्त पावसाची प्रतीक्षा आहे. अन्यथा पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होणार असल्याची चिन्हे आहेत. एप्रिलमध्ये पालखेडच्या पाणी आवर्तनाने शहर साठवण तलावात सुमारे ४० द.ल.घ.फूट पाणी भरले. जुलैअखेरपर्यंत आपल्याला पाण्याची काहीच चिंता नाही अशा वल्गना झाल्या. सुरुवातीला आवर्तनानंतर १० दिवस पाणी चांगल्या पद्धतीने मिळाले. पुन्हा सहानंतर ८ आणि १८ मेपासून दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. पालखेड पाणी आवर्तनाने शहर साठवण तलावात एप्रिलमध्ये भरलेले ४० द.ल.घ.फूट पाणी जुलैअखेर पुरणार असे आकडेवारी सांगत होती.शहराला दररोज ५० लाख लिटर पाणी लागते. बाष्पीभवन व पाण्याचा अन्य मार्गाने अपव्यय झाला तरीही जुलैअखेर पुरायला हवे होते. नेमके गणित कुठे बिघडते हे सर्वांना समजत असूनही त्यावर प्रभावी उपाययोजना होत नाही, ही येवलेकरांची शोकांतिका आहे. दहा दिवसाआड पाणीपुरवठा करूनही अवघ्या अडीच महिन्यात अशी भीषण पाणीटंचाई शहरवासीयांच्या वाट्याला येत आहे. या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न सोशिक शहरवासीय विचारू लागले आहेत. गेल्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात शहरात अतितीव्र पाणीटंचाई भासली. या टंचाईत अनेकांनी शहराची तहान भागवण्यासाठी टँँकरची स्वखर्चाने व्यवस्था केली होती. (वार्ताहर)
साठवण तलावाने गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2016 10:21 PM