नाशिक : गेल्या बुधवारपासून मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाºया चाकरमान्यांनी एस.टी. बसचा आधार घेतला आहे. मनमाड, नाशिकहून मुंबईला जाणाºया गाड्या तीन दिवसांपासून रद्द होत असल्याने नियमित रेल्वेने प्रवास करणाºया सुमारे ८० टक्के कामगार, व्यावसायिक वर्गाला मुंबई गाठण्यासाठी बसचा आधार घ्यावा लागला. या प्रवाशांसाठी एस.टी. महामंडळाला दररोज किमान ४० बसेस जादा सोडाव्या लागल्या.गेल्या बुधवारी आसनगाव-वाशिंद रेल्वेस्थानक दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसला पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास अपघात झाल्यानंतर मुंबईला जाणारी आणि मुंबईहून येणारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी पंचवटी आणि गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या इगतपुरीत थांबविण्यात आल्या होत्या, तर राज्यराणी एक्स्प्रेस नाशिकरोड स्थानकातूनच रद्द करण्यात आली होती. अशावेळी इगतपुरीहून रेल्वेच्या प्रवाशांना एस.टी. मुंबईला सोडण्यात आले, तर नाशिकरोडच्या प्रवाशांसाठी महामार्ग बसस्थानक येथून जादा बससेची व्यवस्था करून देण्यात आली. याचदिवशी सायंकाळच्या सुमारास प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याने सायंकाळी २० जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. अपघातानंतर त्याचदिवशी रात्री मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने मध्य रेल्वेच्या सर्वच गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. दुसºया आणि तिसºया दिवशीही प्रवाशांना बसने कसारा आणि कल्याणपर्यंत सोडले. या मार्गावरील रेल्वेसेवा अद्यापही सुरळीत झाली नसल्याने आणि गाड्याच रद्द करण्यात आल्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत होईपर्यंत दररोज मुंबईला ये-जा करणाºया चाकरमान्यांनी एस.टी. बसचा पर्याय निवडला होता. दि. ३० रोजी नियमित गाड्यांव्यतिरिक्त ८६, ३१ रोजी ३६, तर शुक्रवारी म्हणजेच दि. १ सप्टेंबर रोजी ३४ जादा गाड्या मुंबईसाठी सोडण्यात आल्या. महामार्ग स्थानकातून मुंबईसाठी दररोज किमान ६१ गाड्या धावतात. मात्र प्रवाशांची गर्दी लक्षात घेता गेल्या तीन दिवसांत महामंडळाने प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या उपलब्ध करून दिल्याने अनेकांची सोय झाली. केवळ नाशिक किंवा इगतपुरीतूनच नव्हे तर मनमाड, नांदगाव येथूनही २६ गाड्यांच्या माध्यमातून प्रवाशांना महामार्ग बसस्थानकापर्यंत आणले गेले. उत्तर भारतातून येणाºया गाड्या मनमाडपर्यंतच, तर काही गाड्या या भुसावळला थांबविण्यात आल्याने मनमाडपर्यंत आलेल्या प्रवाशांना बसने नाशिकला महामार्ग स्थानकात आणून तेथून मुंबईला जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली.
८० टक्के रेल्वे प्रवाशांना एसटी बसचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 12:02 AM