नाशिक : साने गुरुजींच्या कार्याचा वसा घेतलेल्या आणि त्यांच्या नावाने सुरू असलेल्या नाशिक येथील शिक्षण संस्थेने आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाचा आधार देण्याची जबाबदारी उचलली आहे. केवळ नाशिकमध्येच नव्हे तर नगर जिल्ह्यातील अशा पाल्यांसाठीदेखील योजना आखण्यात आली आहे. नाशिक आणि नगर या जिल्ह्यांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पाल्यांसाठी अनेक संस्था काम करीत आहेत. या माध्यमातून त्यांनी आश्रय मिळाला असला तरी शिक्षणाचा आधार देण्याचे काम साने गुरुजी शिक्षण संस्थेने घेतले आहे.आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबातील मुलांना प्राथमिक वर्गापासून ते पदवीपर्यंतचे सर्व शिक्षण कोणत्याही शुल्काशिवाय देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रवीण जोशी यांनी सांगितले. या योजनेत विद्यार्थ्यांना वर्षभर लागणारी पुस्तके, वह्या, गणवेश, परीक्षा शुल्क, प्रवासाचा खर्च आदींचा समावेश असून, हा सर्व खर्च संस्था करणार आहे. यासाठी शाळेचे शिक्षक आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. शेतकºयांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मुलांचे शिक्षण संपून जाते. त्यांना निवारा मिळतो, कसेबसे पोटही भरते, परंतु शिक्षणापासून ही मुले वंचित राहू नयेत म्हणून साने गुरुजींच्या विचाराने प्रेरित संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:37 AM