नाशिक : पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने गोदावरी व दारणा नदीला आलेल्या पुरामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला मोठा आधार मिळाला असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातून गेल्या आठ दिवसांत किमान नऊ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात पोहचले आहे. नगर व मराठवाड्यांतील जिल्ह्यांची तहान भागविण्याची जबाबदारी असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पाण्यावर नेहमीच त्यांचा डोळा असतो. दरवर्षी पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात किती पाऊस पडला व धरणे किती भरली यावर त्यांचे लक्ष असते. विशेषकरून गंगापूर व दारणा धरणातून दरवर्षी नगर व मराठवाड्यांसाठी पाणी सोडले जाते. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून तीन वर्षांपूर्वी मोठे रणकंदन माजले होते. राज्य सरकारने नाशिकवर दबाव टाकून १२ टीएमसी पाणी गंगापूर धरणातून पळविल्याने या विषयावरून राजकारणही रंगले होते. नाशिकमध्ये सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात येऊन भाजपाला आरोपीच्या पिंजºयात उभे करण्यात आले, तर प्रकरण थेट उच्च न्यायालयात पोहोचल्याने बरीच चर्चा झडली. मुळा धरणातूनही सोडले पाणीगेल्या वर्षी जिल्ह्यात १३० टक्के पाऊस झाल्याने जुलै महिन्यातच गंगापूर धरणात ८० टक्के जलसाठा झाला होता. त्यामुळे गोदावरीला दोनवेळा आलेल्या पुरामुळे जायकवाडीत पुरेसे पाणी पोहोचले होते. यंदाही गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाच्या संततधारेमुळे गोदावरी व दारणा धरणांत ७९ टक्के जलसाठा झाला. दोन्ही धरणांच्या क्षेत्रात पाऊस कायम असल्यामुळे धरणाची सुरक्षितता लक्षात घेता गेल्या सोमवारपासून गंगापूर व दारणा धरणांतून पाणी सोडले जात आहे.दारणा व गोदावरीचे पाणी नांदुरमधमेश्वर बंधाºयात पोहोचून तेथून ते पुढे नगरमार्गे जायकवाडीत जात आहे. नगर जिल्ह्यातील मुळा धरणातूनही पाणी सोडण्यात आल्याने गेल्या आठ दिवसांत जायकवाडी धरणात किमान नऊ टीएमसी पाणी पोहोचल्याचा दावा अधिकाºयांनी केला आहे. सध्या जायकवाडीत २८ टक्के साठा झाला आहे.
गोदावरीच्या पुराचा जायकवाडीला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:20 AM