नाशिक : उपनगर, टाकळी, त्याप्रमाणेच जेलरोड, जुना सायखेडा रोड, एकलहरा रोड भागातील वसाहतींमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. डासांमुळे रात्रीची झोपही कठीण झाली असून, परिसरात औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
बिटको रुग्णालयात बाह्य हस्तक्षेप
नाशिक : नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात बाह्य व्यक्तींचा हस्तक्षेप नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. राजकीय, तसेच सामाजिक मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून नेहमीच येथील आरेाग्य यंत्रणेला वेठीस धरले जात असल्याचे बोलले जाते. अत्याधुनिक कोविड हॉस्पिटलमध्येही बाह्य हस्तक्षेप वाढला आहे.
कुठे भरतो बाजार; तर कुठे बंदी
नाशिक : येत्या २२ तारखेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन लागू असल्याने भाजी बाजारावरदेखील निर्बंध आहेत; परंतु शहरातील काही भागांत सकाळच्या सुमारास राजरोसपणे बाजार भरला जातो, तर काही ठिकाणी पोलिसांचा दंडुका बरसतो. शहरात असे विसंगत चित्र दिसत असल्याने मनपाने स्पष्टपणे भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे.
गुटखा विक्री करणाऱ्यांकडे दुर्लक्ष
नाशिक : शहरात राजरोसपणे गुटखा विक्री सुरू असतानाही पोलीस यंत्रणेकडून अशा विक्रीला अभय दिले जात असल्याची चर्चा आहे. पोलीस अशा दुकानांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने दुकानांमध्ये, टपऱ्यांमधून सहजपणे बंदी असलेला मावा, गुटखा विक्री केली जात असल्याचे दिसते.
बॅरिकेड लावूनही वाहतूक सुरूच
नाशिक : जिल्ह्यात लॉकडाऊन लागू असल्याने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड लावले आहेत. मात्र, एकीकडे बॅरिकेड लावलेले असतानाही वाहनधारक पर्यायी मार्गाने वाहने नेत असल्याने बॅरिकेड लावून काय साध्य केले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.