नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये आणि मालेगाव महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या ट्रु नॅट मशीनच्या कामकाजाला सुरळीतपणे प्रारंभ झाला आहे. या दोन्ही मशीनवर कोरोनाच्या तातडीच्या नमुन्यांची प्राथमिक चाचणी करण्यात येत असल्याने जिल्ह्यातील इमर्जन्सी केसेसबाबत अहवाल स्थानिक स्तरावरच आणि त्याच दिवशी मिळणे शक्य झाले आहे. आयसीएमआर या राष्ट्रीय संस्थेकडून चाचण्या घेण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आल्यामुळे ट्रु नॅट मशीनवर नुमन्यांच्या तपासणीस प्रारंभ करण्यात आला. क्षयरोग विभागाकडून या दोन मशीन्सना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरकडे सुपूर्द करण्यात येणार होते. परंतु, नागपूरपेक्षा नाशिक शहर आणि जिल्ह्याची स्थिती अधिक बिकट असल्याचे यंत्रणेच्या लक्षात आले. त्यामुळे नाशिक आणि मालेगाव शहराच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून हे ट्रुनॅट मशीन नाशिकच्या दोन रुग्णालयांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या मशीनवरील चाचण्यांची नोंददेखील आयसीएमआरच्या साइटवर केली जात आहे. त्यापूर्वी आयसीएमआरकडून या तपासणीच्या नोंदी त्यांच्या साइटला जोडून त्यासंदर्भात ग्रीन सिग्नल मिळेपर्यंत चाचण्या सुरू करण्यात आल्या नव्हत्या. सद्यस्थितीत नाशिक शहरातील बाधितांच्या किंवा अन्य उपचारांसाठीदेखील दाखल होणाºया कोविड संशयितांच्या नमुन्यांची तपासणी पुण्याच्या प्रयोगशाळेत, तर मालेगावच्या संशयितांची तपासणी धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड तपासणी केंद्रात केली जाते. मात्र, तातडीचे किंवा वैद्यकीय कारणास्तव काही अग्रक्रमाचे अहवाल असल्यास त्यांची तपासणी या मशीनवरच केली जात आहे. टीबीचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या गेलेल्या सीबीनॅट आणि ट्रुनॅट मशीनमध्ये काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. कोविड तपासणीसाठी त्यात वेगळे सॉफ्टवेअर आणि चीप बसविण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीच्या डीएनएनचे अॅम्प्लिफिकेशन करून तो विषाणू आहे की नाही ते मशीन शोधून त्याबाबतचा अहवाल संगणकावर देते. दरम्यान, ट्रुनॅट मशीन हे एकाचवेळी दोन रुग्णांच्या थुंकीच्या नमुन्यांची चाचणी करता येते. साधारणपणे दोन तासांत दोन्ही चाचणीचा अहवाल मिळू शकतो. दाट संशयित, गर्भवती महिला, संशयित मृत किंवा एखादा अन्य आजारांने बाधित मात्र त्या उपचारापूर्वी कोरोना निगेटिव्ह टेस्ट मिळणे अपेक्षित असलेल्या रुग्णांची मोठी सोय झाली आहे. त्यामुळे आता दिवसभराच्या कामकाजाच्या वेळेत डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात १२ चाचण्या तपासणी केंद्रात होत असल्याची माहिती झाकीर हुसैन हॉस्पिटलच्या डॉ. कल्पना कुटे यांनी दिली.
तातडीच्या अहवालांसाठी ट्रुनॅट मशीनचा आधार ; दिवसभरात किमान १२ नमुन्यांची होते चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 4:34 PM
आयसीएमआरकडून चाचण्या घेण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आल्यामुळे ट्रु नॅट मशीनवर नुमन्यांच्या तपासणीस प्रारंभ करण्यात आला. महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये आणि मालेगाव महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या ट्रु नॅट मशीनच्या कामकाजाला सुरळीतपणे प्रारंभ झाला आहे.
ठळक मुद्देकोरोनाच्या तातडीच्या नमुन्यांची प्राथमिक चाचणी ट्रु नॅट मशीनद्वारे ट्रु नॅट मशीनच्या कामकाजाला सुरळीतपणे प्रारंभझाकीर हुसैन हॉस्पिटल आणि मालेगाव महापालिकेच्या रुग्णालयात वापर