त्र्यंबकेश्वर : अनंत चतुर्दशी आणि पौर्णिमेच्या दुग्धशर्करा योगावर रविवार, दि. २७ रोजी हजारो सेवेकऱ्यांनी कुशावर्तावर गुरुमाउलींच्या उपस्थितीत सिंहस्थस्नानाची पर्वणी साधली. श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि त्र्यंबकेश्वरातील पुरोहितवृंदाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो सेवेकऱ्यांनी पर्जन्यसूक्ताचा सामुदायिक पाठ करून पर्जन्यराजास साकडे घातले.त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठावर गर्दी केली होती. ओंकारेश्वर (मध्य प्रदेश), काशी (उत्तर प्रदेश), नाशिकमध्ये होणारा कृषी महोत्सव, सेवेकऱ्यांची पर्वणी, दिवाळीतील बालसंस्कार शिबिर अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन गुरुपीठावरील बैठकीत करण्यात आले. २२ ते २६ जानेवारी २०१६ या कालावधीत नाशिकमध्ये कृषी महोत्सव संपन्न होत असून, याच कालावधीत समर्थ सेवेकरी रोज विभागवार सिंहस्थस्नानाचा आनंद लुटणार असल्याची घोषणा अण्णासाहेब मोरे यांनी केली.कुशावर्तावरील मुख्य कार्यक्रमाच्या आधी गुरुपीठावर गुरुमाउली अण्णासाहेब मोरे आणि चंद्रकांतदादा मोरे यांचे हस्ते पालखीपूजन करण्यात आले. पालखीसह सेवेकरी स्वामीनामाचा घोष करीत कुशावर्तावर आले. या मिरवणुकीने त्र्यंबकवासीयांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणूक कुशावर्तावर पोहचताच सर्वांनी पर्जन्यसूक्ताचे सामुदायिक वाचन केले. यानंतर अण्णासाहेब मोरे, चंद्रकांत व नितीन मोरे यांनी सपत्नीक गंगापूजन केले तसेच महाआरती संपन्न झाली.