सारांश
नाशिक जिल्ह्यात अद्याप तरी कोरोनाबाधित आढळून आलेला नाही हे खरे असले तरी, निवांत अगर बेफिकीर राहून चालणारे नाही. अत्यावश्यक सेवेच्या गरजेपोटी घराबाहेर पडणाऱ्यांपेक्षा घरात करमत नाही म्हणून रस्त्यावर येणाऱ्यांची संख्याच अधिक असल्याने, त्यांना आवरणे गरजेचे झाले असून, जिल्हा प्रशासन व पोलिसांची शक्ती त्यातच खर्ची पडणे योग्य नाही. स्वत:च्या व एकूणच समाजाच्याही सुरक्षिततेसाठी सामूहिक सावधानतेची आज मोठी गरज असल्याचे सुजाणांनी लक्षात घ्यायला हवे.
‘कोरोना’चे संकट आपल्या दाराशी येऊन ठेपले आहे. अगदी आपल्या जिल्ह्यालगतच्या मुंबई, पुणे, नगर, जळगाव परिसरातही बाधित आढळून आल्याने चिंतेत भर पडून गेली आहे. सुदैवाने नाशिक जिल्हा प्रशासनाने वेळीच सावध होत तातडीने उपाययोजना केली. विशेषत: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस यांचे कौतुक करायला हवे, ते रुग्णालयात दाखल होणाºया सर्व संशयितांची यथायोग्य काळजी घेत आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे स्वत: यासंबंधातील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत, तर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटीलदेखील संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा कशा सुरळीत राहतील याची खबरदारी घेत आहेत. जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त या दोघा उच्चपदस्थांनी शहरातील मान्यवर व स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींशी सोशल कनेक्ट ठेवून अडीअडचणी जाणून घेण्याची आणि त्यावर स्वत: सक्रियपणे शंका-निरसनाची सुहृदयता दाखविली आहे, तेव्हा केवळ संबंधितांची कर्तव्यतत्परता म्हणूनच याकडे पाहता येऊ नये, तर त्यातून प्रसुत होणारी शासन-प्रशासनाची तळमळ, तत्परताही सामान्यांसाठी दिलासादायक ठरली आहे. आपल्या शेजारील जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक बनू पाहात असताना नाशिक तूर्त तरी कोरोना ‘बाधित’ झालेले नाही, त्यामागे या साºया घटकांचे अविश्रांत नियोजन, मेहनत आहे व त्याला मोठ्या प्रमाणात नाशिककरांचीही साथ लाभली आहे, हेदेखील समाधानाचे आहे. पण...
पण, तरी काही लोक या ‘लॉकडाउन’मागील गांभीर्य समजून घेताना दिसत नाहीत. यातून अत्यावश्यक सेवा वगळल्याचे व त्या सेवा कोणत्या हे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांपासून सर्व संबंधित यंत्रणांनी स्पष्ट करूनही अनाठायी भीतीतून अनेकजण भाजी मार्केट, किराणा दुकानात गर्दी करताना दिसत आहेत. ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठीच्या खबरदारीतून ठेवावयाच्या ‘सोशल डिस्टन्सिंग’चा कसलाही विचार न करता ही गर्दी होत आहे. शहरातील जॉगिंग ट्रॅक्स बंद केले तरी काही लोक आपापल्या परिसरात पाय मोकळे करताना दिसतात, अखेर पोलिसांना ड्रोन कॅमेºयाद्वारे पेट्रोलिंग करण्याची वेळ आली. कोरोनाचा धोका किंवा संकट हे काही एका-दुसºयासाठीचे नाही, एकापासून अनेकांवर ओढावणारे ते संकट आहे. तेव्हा सामाजिक जबाबदारीचे भान बाळगून स्वत:सोबत सर्वांचीच काळजी घेणे गरजेचे बनले आहे. पण होम क्वॉरण्टाइन केलेलेही रस्त्यावर आढळून येतात, त्यामुळे अशांची माहिती कळविणे गरजेचे आहे.
महत्त्वाचे म्हणजे, शासन अतिशय गतिमानतेने कोरोनाशी लढाईसाठी तत्पर आहे. राजकीय मतभेद बाजूस ठेवून सर्वपक्षीय सहकार्य त्यासाठी लाभत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची धडाडी व संवेदनशीलता नजरेत भरणारी आहे, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व खासदार-आमदारांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीस मदत घोषित केली आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ वेळोवेळी आढावा घेत योग्य त्या उपाययोजनांच्या सूचना देत आहेत. कृषिमंत्री दादा भुसे यांनीही कृषिमालाच्या आयात-निर्यात व विक्रीबाबतच्या अडचणी टाळण्याचे निर्देश दिले आहेत. नाशकातील प्रा. देवयानी फरांदे, अॅड. राहुल ढिकले, बागलाणचे दिलीप बोरसे यांच्यासारख्या मोजक्या आमदारांनी आपापल्या परिसरातील हातावर पोट असणाºयांच्या पोटा-पाण्याची व्यवस्था केलेली दिसतेय; पण इतर लोकप्रतिनिधी कुठे आहेत? समाजसेवी संस्था मोठ्या प्रमाणात सेवेसाठी सरसावल्या असताना पुढारपण करणारे मात्र ‘होम क्वॉरण्टाइन’ दिसत आहेत. अशा संकटकाळात खरे तर ज्याला जी जमेल ती मदत करून एकमेका साह्य करण्याची भूमिका घेतली जाणे गरजेचे आहे. तेव्हा आगामी काळात या आघाडीवर संवेदनेचा प्रत्यय येणे अपेक्षित आहे. शासन, प्रशासन, समाज अशा सर्व पातळीवरील सक्रियता व सहकार्याच्या बळावरच ‘कोरोना’शी लढता व विजय प्राप्त करता येणार आहे.