अलंगुण : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वेगाने वाढत असताना सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बहुल भाग कोरोनामुक्त होता. असे असतांना या भागातील कोटंबी व बेडसे या आदिवासी गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दवाखाना व मेडिकल या अत्यावश्यक सेवा वगळून बार्हे बाजारपेठ दि.२५ जुलै ते १ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.मागील आठवड्यात कोटंबी या आदिवासी दुर्गम गावातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. तिच्या संपर्कात आलेले कुटुंबातील तीन व बेडसे येथील एक असे चार जण बाधित झाल्याने परिसरात एकूण पाच रु ग्ण कोरोना आढळून आहेत. त्यामुळे आता आदिवासी दुर्गम भागातही कोरोनाचा शिरकाव झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून बाजारपेठ बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी सरपंच परशराम वार्डे, उपसरपंच त्र्यंबक ठेपणे, पोलीसपाटील हंसराज खंबाईत, देविदास गावित, हुशार देशमुख, युवराज जाधव, मुरलीधर धूम, हेमंत महाले आदी उपस्थित होते.