आपल्याकडे कोणत्याही यशाला तत्कालिक कौतुकापलीकडे जाऊन बघण्याची दृष्टीच नाही. त्यामुळे पुरस्कारार्थीचे प्रासंगिक अभिनंदन वगैरे केले की विषय संपल्यात जमा होतो. त्यामुळे संस्थागत पातळीवर संबंधित यशोदायी कामाची माहिती घेऊन ते अन्यत्रही साकारण्याची प्रक्रिया फारशी घडून येत नाही. सरकारी यंत्रणांनी यासंदर्भात प्रयत्न केल्यास व यशस्वी कार्याचे ‘डाक्युमेंटेशन’ करून ते इतरांना उपलब्ध करून दिल्यास अनेकांची वाटचाल सुकर व सुखदायी ठरू शकेल.शासनातर्फे दरवर्षी विविध स्तरावर उत्कृष्ट कार्यासाठी ग्रामपंचायतींना पुरस्कार दिले जातात. यात जिल्हा परिषद यंत्रणेची भूमिका महत्त्वाची असते. यंदाही स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत दिंडोरी तालुक्यातील अवनखेड, निफाड तालुक्यातील सुकेणे, बागलाणमधील डांगसौंदाणे तसेच सावकी, ता. देवळा, शिरसाने व राजदेरवाडी, ता. चांदवड, जळगाव नेऊर, ता.येवला आदींना पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सन्मानित करण्यात आले. शासनाने आखून दिलेल्या स्वच्छ व ‘स्मार्ट’ नेसमध्ये अंतर्भूत असलेल्या निकषातील उत्कृष्ट कामगिरीमुळे हा गौरव संबंधितांना प्राप्त झाला. याहीखेरीज अन्य योजनांमध्ये अशा संस्थांचे वेळोवेळी गौरव होत असतात. ते इतरांसाठी प्रेरणादायीच ठरतात. पण, फक्त कौतुकाच्या पातळीवर ते सीमित न ठेवता संबंधित ग्रामपंचायतींनी केलेल्या विशेष कार्याची टिपणी करून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना अनुकरण अगर अवलोकनासाठी पाठविली गेली तर त्यातून खऱ्या अर्थाने संबंधित पुरस्कारार्थींचे कार्य इतरांसाठी दिशादर्शक ठरू शकेल. आज तसे होताना दिसत नाही. यंत्रणा आपल्या पातळीवर गुणांकन करतात व पुरस्कारार्थींची निवड होते. त्यात नंबर हुकलेल्यांना आपण कुठे मागे पडलो हे लक्षात येण्याची काही व्यवस्था करता आल्यास पुढच्या वेळी निश्चितच फरक दिसून येऊ शकेल. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच तरुण असून, नव्या उमेदीने व विविध कल्पना राबवून ते ग्रामविकास करण्यासाठी धडपडतांना दिसतात. स्वच्छता, पाणीपुरवठा, तंटामुक्ती, कुºहाडबंदी, आरोग्य-शिक्षण आदी विविध बाबतीत काहींनी अप्रतिम काम चालविले आहे. ‘लोकमत’च्या सरपंच अवॉर्डच्या निमित्तानेही ते प्रामुख्याने बघावयास मिळाले होते. अशांच्या वैशिष्टपूर्ण कार्याची माहिती इतरांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे. याचसोबत पुरस्कारप्राप्त सरपंचांना ‘रोल मॉडेल’ म्हणून अन्य ग्रामपंचायतींमध्ये मार्गदर्शनासाठी पाठविले गेले तर त्यातून संबंधितांचा व्यापक अर्थाने नेतृत्व विकास घडून येतानाच, स्पर्धेत मागे पडलेल्यांनाही मार्गदर्शन लाभू शकेल. पानी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत तालुकास्तरीय प्रथम पुरस्कारही जिल्ह्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीस मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अभिनेते आमीर खान आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संबंधितांचा गौरव करण्यात आला. अशांचीही नोंद घेऊन त्यांचे प्रयत्न इतरांच्या निदर्शनास आणून दिले जावयास हवे. केवळ तात्कालिक कौतुक व सोहळा आटोपून न थांबता अभिनंदनीय कार्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचविली जावी, इतकेच यानिमित्ताने.
कौतुकाचे चीज व्हावे !
By किरण अग्रवाल | Published: August 19, 2018 1:13 AM