नाशिक : मागील चार दिवसात गिरणारे-गंगाम्हाळुंगी आणि दिंडोरी वन परिमंडलातील वाडगाव, जुने धागुर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालिकांना आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर नाशिक पूर्व-पश्चिम वन विभाग खडबडून जागा झाला आहे.
वन खात्याकडून प्रभावीपणे जनजागृती केली जात असून या भागातील गावांमध्ये दर्शनी ठिकाणी सावधानतेचा इशारा व खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. तसेच फिरत्या गस्ती पथकाच्या वाहनांद्वारे ध्वनिक्षेपकावरून जनजागृतीवर भर दिला जात आहे.
गिरणारे गावापासून उत्तरेला जवळच असलेल्या वाडगावमध्ये गुरुवारी (दि. ३०) बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या निंबेकर (५) या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली होती. हा हल्ला झाला तो परिसर जंगल व मळे भागाचा असून तेथे मोजकीच काही झोपडीवजा घरे असल्याचे वन अधिकारी यांनी सांगितले. रात्री या भागात अंधाराचे साम्राज्य असते. तसेच रविवारी (दि. ३) असाच परिसर असलेल्या उसाच्या शेतीला लागून जुने धागुर शिवारात बिबट्याने ऊसतोड कामगारांच्या राहुट्यांच्या ठिकाणाहून पाचवर्षीय ऋत्विका विठ्ठल वड (४, मूळ रा. सुतारपाडा, गुजरात) हिला उचलून नेले होते. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी तिचा अर्धवट स्थितीतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर पूर्व वन विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण व पश्चिम विभागाचे पंकज गर्ग यांनी वन क्षेत्रपालांना तातडीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत गस्त वाढविण्याचे आदेश दिले आहेत. गस्तीच्या दरम्यान, जवळच्या पोलीस ठाण्यालाही माहिती दिली जात असून पोलिसांचीही मदत वन खात्याकडून घेतली जात असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
--इन्फो--
पाच पथके गस्तीवर; ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे माग काढण्याचा प्रयत्न
बिबट्याच्या शोधात एकूण पाच पथके दिवस-रात्र गस्तीवर असून वाडगाव शिवारात एकूण चार पिंजरे आणि पाच कॅमेरे, तर जुने धागुर शिवारात चार पिंजरे व ट्रॅप कॅमेरे सज्ज करण्यात आले आहेत. रात्रीच्यावेळीसुध्दा या भागात नागरिकांना सावधगिरीचा इशारा गस्ती पथकाच्या वाहनाद्वारे दिला जात आहे. तसेच वणी फिरते पथकालाही या भागात दिंडोरी वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मदतीला अतिरिक्त म्हणून पाचारण करण्यात आले आहे.
--
-