नाशिक : भारतीय हीच तुमची जात अन् भारताचे रक्षण हाच तुमचा धर्म आहे. तोफखान्याच्या उत्कृष्ट अशा दलाद्वारे तुम्ही भारतीय सेनेत दाखल झाला आहात. आपल्या अंगावरील वर्दी ही तुम्ही मोठ्या कष्टाने कमावली असून, या वर्दीचा अभिमान व सन्मान राखावा, असा कानमंत्र विशिष्ट सेवा पदक विजेते स्कूल आॅफ आर्टिलरीच्या ‘गनरी’चे मुख्य प्रशिक्षक मेजर जनरल पी. रमेश यांनी दिला.निमित्त होते, नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या शपथविधी सोहळ्याचे. शनिवारी (दि.८) केंद्राच्या संचलन मैदानावर उगवत्या दिनकराच्या साक्षीने दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडला. ४२ आठवड्यांचे खडतर व कठोर असे प्रशिक्षण घेत स्वत:ला ‘तोपची’ म्हणून सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन केले. यावेळी तोफखान्याच्या बॅन्ड पथकाने वाजविलेल्या ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा...’ या देशभक्तीपर धूनने जवानांचा उत्साह वाढविला. यावेळी मेजर जनरल पी. रमेश यांना तोफखान्याचे कमांडंट ब्रिगेडियर जे. एस. गोराया यांनी उमराव कवायत मैदानाच्या सलामी मंचावर लष्करी थाटात आणले. यावेळी उपस्थित नवसैनिकांनी त्यांना ‘सॅल्यूट’ केला.याप्रसंगी पी. रमेश म्हणाले, आपल्या पूर्ण कारकिर्दीत आजचा दिवस सदैव स्मरणात ठेवा. तोफखाना केंद्राचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मला विश्वास आहे, की तुम्ही उत्कृष्ट ‘तोपची’ म्हणून स्वत:ला सिध्द कराल. समाज सैनिकाकडे एक आदर्श नागरिक म्हणून बघत असतो, त्यामुळे सैनिक धर्म व शिस्त आयुष्यात कधीही विसरता कामा नये, असेही ते यावेळी म्हणाले...या प्रशिक्षणार्थींचा झाला गौरव४परेड कमांडर अमोल वानखेडे (बेस्ट इन ड्रील), प्रतीक के. एस (अष्टपैलू), अजित कुमार (उत्कृष्ट तंत्रज्ञ), दीपक यादव (तंत्रज्ञ), हरिकेश (रेडियो आॅपरेटर), रिषभ दुबे (उत्कृष्ट गनर), श्रीजीत ए. एस. (वाहनचालक), चिन्मया प्रधान (उत्कृष्ट शेफ) यांना लक्षवेधी कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पदक देऊन गौरविण्यात आले.माता-पित्यांना गौरव पदक४समारोपानंतर आवारातील हिरवळीवर ३३३ नवसैनिकांच्या माता-पित्यांना तोफखान्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सन्मानाने ‘गौरव पदक’ प्रदान केले.‘मेरी संतान देश को समर्पित’ असे वाक्य या पदकावर होते.
वर्दीचा अभिमान अन् सन्मान राखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 11:13 PM
नाशिक : भारतीय हीच तुमची जात अन् भारताचे रक्षण हाच तुमचा धर्म आहे. तोफखान्याच्या उत्कृष्ट अशा दलाद्वारे तुम्ही भारतीय ...
ठळक मुद्देपी. रमेश । तोफखान्याच्या ३३३ नवसैनिकांनी घेतली देशसेवेची शपथ