जळगाव नेऊर : पंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामपातळीवरील जिल्हा परिषद शाळांचे पालकत्व ग्रामपंचायतीकडे दिले आहे. ग्रामपंचायती शाळांच्या विकासाबरोबरच शाळांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवतील म्हणून राज्यकर्त्यांनी ही व्यवस्था केली आहे. राज्यकर्त्यांची ही अपेक्षा सार्थ ठरवत जळगाव नेऊर (ता.येवला) येथील जि.प.प्राथमिक शाळा डिजिटल व सुशोभीकरणासाठी ग्रामपंचायतच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीला लोकवर्गणीची जोड मिळून प्राथमिक शाळेला झळाळी देण्याचा प्रयत्न शिक्षकवर्ग करत आहे. त्यासाठी जळगाव नेऊर ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून येथील एक वर्गखोली, तर आडवाट शाळेतील एक वर्गखोलीची रंगरंगोटी करण्यासाठी २८ हजार रुपये, तर तीन एलईडीसाठी ८१ हजार रुपये निधी खर्च झाला. याबरोबरच शाळेचा बाह्य परिसर सुशोभीकरण व दर्शनी भागात गावाची वैशिष्टे रंगवण्यात आली आहेत. लोकवर्गणीच्या माध्यमातून जि.प. शाळा डिजिटल वर्ग, शालेय परिसरात वृक्षलागवड करुन सुशोभीकरणाचे प्रयत्न सुरू आहे. सरपंच हिराबाई शिंदे, उपसरपंच श्रीदेव शिंदे, मच्छिंद्र शिंदे, ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे, ग्रामपंचायत पदाधिकारी, शालेय समिती पदाधिकारी व ज्येष्ठ ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक शैलेश आहेर, शिक्षक मनीषा वाक्चौरे, अनुराधा देशमुख, सतीश वाक्चौरे विद्यार्थ्यांना ज्ञान दान करत आहेत. शाळेच्या प्रांगणात रेखाटण्यात आलेली पाणी वाचवा, झाडे लावा, किल्ल्यांची माहिती, शाळेला गावाचा आधार असावा, गावाला शाळेचा अभिमान असावा, बेटी बचाओ, बेटी पढाओ, धूम्रपान निषेध अशी घोषवाक्य लक्ष वेधून घेत आहे. शाळेच्या दर्शनी भागात पैठणी हातमाग चित्र व पैठणींंच्या दालनांची नावे अधोरेखित केली आहे. जळगावातील युवक सैन्य दलात आहे, सैनिकांप्रति आदरभाव निर्माण व्हावा यासाठी देशाच्या सीमेवर सैनिक तैनात असल्याचे चित्र रेखाटले आहे.
जळगाव नेऊर शाळेचे सुशोभीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 1:19 AM