नाशिक : दहावीच्या वर्गात येऊनदेखील मुलांची मराठी भाषा खूप काही पक्की झालेली नसते. कारण पालकांकडून पाचवीपासूनच त्यांच्या मराठीभाषा विषयाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. अन्य विषय पक्के व्हावे, म्हणून पालकवर्ग भर देतात, तितके प्रयत्न मराठीच्यादृष्टीने होत नाही. वाचन, लेखनसरावाचा दहावीच्या मुलांमध्ये अभाव जाणवतो आणि दैनंदिन व्यवहारात सर्रासपणे इंग्रजी शब्द बोलीभाषेत वापरले जातात, याचा प्रभाव मुलांवर झालेला दिसून येतो, परिणामी मुलांची मराठीमध्ये पिछेहाट होत असल्याचा सूर मराठी शिकविणाऱ्या माध्यमिकच्या शिक्षकांमधून उमटला.मराठी भाषा ही समृद्ध भाषा असून या भाषेत शुद्धलेखनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे; परंतु दुर्दैवाने पाचवीनंतर पालकवर्गाकडून मुलांच्या शुद्धलेखनाकडे हळूहळू कानाडोळा केला जातो आणि दहावीत मुलगा पोहचला तरी त्याच्या मराठीची अवस्था अगदी केविलवाणी झालेली असते. त्यामुळे मराठी मातृभाषा असूनदेखील त्या भाषेचा पेपर सोडविताना मुलांची दमछाक होते. तसेच कमी गुणांवर त्यांना समाधान मानावे लागत असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले. मराठी भाषेचा लेखी पेपर १०० गुणांचा असतो. उपयोजित लेखनप्रकारासाठी ३० गुण, व्याकरणासाठी २० गुण आणि उर्वरित गद्य-पद्याच्या प्रश्नांसाठी ५० गुण अशी विभागणी असते. मुले २१ अपेक्षित किंवा गाइडच्या माध्यमातून मर्यादित स्वरूपाचा अभ्यास करण्यावर भर देतात त्यामुळे त्यांना उपयोजित लेखनप्रकार, व्याकरणाचे प्रश्न सोडविणे अवघड जाते. अवांतर वाचन आणि लिखाणाचा सराव नसल्यामुळे निबंधलेखन, पत्रलेखन, वृत्तांतलेखन, कथालेखन यांसारखे प्रश्न लिहिताना मुलांची दमछाक होते. परिणामी जेथे गुण अधिक मिळविण्यास वाव असतो, तेथेचे मुले कमी पडतात, असे शिक्षकांनी सांगितले. गद्य-पद्य विभागातील लघुत्तोरी, दीर्घोत्तरी किंवा उतारावाचून प्रश्नांची उत्तरे सोडविण्यापर्यंत मुले यशस्वी होतात; मात्र ते केवळ विषयात उत्तीर्ण होण्यापुरतेच.इंग्रजीचा वाढता पगडा घातकदैनंदिन व्यवहारापासून अगदी घरातसुद्धा बोलीभाषेतील मराठी शब्दांऐवजी इंग्रजी शब्दांचा वाढता वापर मातृभाषा विकासासाठी घातक ठरू लागला आहे. इंग्रजीचा वाढत जाणारा पगडा मुलांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाला सुरुंग लावणारा ठरत आहे. मुले मराठी शब्द विसरू लागली असून इंग्रजी शब्द पटकन त्यांच्या लक्षात येतात, असे शिक्षकांनी सांगितले. उलट मुले कधीकधी तर इंग्रजी शब्द उच्चारून त्याला मराठी शब्द काय? असा प्रश्नही विचारतात तेव्हा आश्चर्याचा धक्का बसतो, असेही काही शिक्षकांनी सांगितले.मराठी भाषेत शुद्धलेखनाला खूप महत्त्व आहे. मुलांचे व्याकरण हे दिवसेंदिवस कच्चे होत चालले आहे. यामुळे मराठी भाषेचा पेपर सोडविताना हस्ताक्षरापासून व्याकरणापर्यंतच्या असंख्य चुका विद्यार्थी करतात. मुलांना या प्रकारातील प्रश्नांची उत्तरे सोडविता येत नाही. परकीय भाषेचा मुलांवर अधिक पगडा पडत चालला आहे आणि दुर्दैवाने मातृभाषेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मुलांना गद्य-पद्य, स्थुलवाचन, व्याकरण, उपयोजित लेखन अशा विभागात अभ्यासक्रम आहे. -मनीषा खरे, सुखदेव विद्यालयवाचन, लेखन सरावाचा अभाव असल्यामुळे मुलांची पिछेहाट होत आहे. अवांतर वाचन कमी झाले आहेत. त्यामुळे उपयोजित लेखनप्रकारात मुले कमी पडतात. व्याकरणाचे वीस गुणांचे प्रश्न आणि उपयोजित लेखनप्रकारावरील ३० गुणांच्या प्रश्नांमध्ये मुलांची त्रेधातीरपिट होते. कारण मुलांचे वाचन अगदी कमी झाले आहे. पालकांनी विविध पुस्तकांचे वाचन त्यांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. मुलांमध्ये लिखाणाबद्दलचा रस कमी होत चालला आहे. - भरत भालेराव, पुरुषोत्तम इंग्रजी शाळामराठी भाषेत शुद्धलेखनाला विशेष महत्त्व आहे; मात्र मुले व पालक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे गुणांची कपात होते. व्याकरणावर मुले भर देत नाही. वीस गुणांचे व्याकरणावर आधारित प्रश्न परीक्षेत विचारले जातात. अभिव्यक्तीमध्ये मांडणी करताना मुलांना अडचण निर्माण होते. दैनंदिन व्यवहारात बोली भाषेत इंग्रजी शब्दांचा अतिरेक होतो. उपयोजित लेखनप्रकारचा सरावाचा मुले प्रयत्न करत नाही. संवाद लेखन, वृत्तांत लेखन, पत्रलेखन, निबंधलेखन या प्रकारांमध्ये मुले मागे पडतात. कारण अवांतर वाचनाची पद्धत अलीकडे संपुष्टात आली आहे. शालेय जीवनात मुलांनी ग्रंथालयात जाऊन विविध पुस्तके वाचण्याचा प्रयत्न क रायला हवा तसे पालकांकडूनही प्रबोधन व्हायला हवे. -मीनाक्षी बोरसे, एलव्हीएच विद्यालय, सावतानगरमराठी आणि अमराठी मुलांसाठी मराठी भाषा वेगळी आहे. अन्य भाषिकांना या भाषेतून परीक्षा देणे आणि गुण मिळविणे तितकेसे सोपे नसते. परंतु मराठी कुटुंबातील मुलांच्या चौफेर मराठी भाषेचा वापर असल्याने त्याला अडचण येत नाही. इंग्रजी भाषेत मराठी आणि अमराठी अशा दोन्ही भाषिक मुलांना मराठी विषयाच्या तुलनेत चांगले गुण असतात. - नंदा पेठकर, मुख्याध्यापक, रंगुबाई जुन्नरे स्कूल
इंग्रजीचा प्रभाव अन् वाचनाच्या अभावामुळे पिछेहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:39 PM