सटाणा : समाजाचे आपण काही देणं लागतो या उद्देशाने प्रेरित बागलाणच्या भूमिपुत्राने आपल्या एकुलत्या एक चिमुरडीचा पहिला वाढदिवस अपंगांवर उपचारासाठी पन्नास हजार रुपयांची रक्कम येथील अपंग कल्याण केंद्राकडे सुपूर्द करून साजरा केला. उच्च शिक्षण घेऊन अनेक तरुण विदेशात नोकरीला आहेत. तगडे पॅकेज मिळत असल्यामुळे आरामाचे जीवन जगण्याकडे अनेकांचा कल असतो. हे करताना समाजाशी असलेली बांधिलकीही काही जण विसरतात. मात्र, समाजात वावरताना अजूनही माणुसकीचा झरा आटला नसल्याचे चित्र बघायला मिळते. बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाजीराव नानाजी पगार यांचा मुलगा दिनेश दुबई येथील कंपनीत आहे. दिनेश यांची मुलगी स्पर्शा ही वर्षांची झाली. पहिला वाढदिवस साजरा करावा म्हणून, कुटुंबातील सदस्य कामालाही लागले. मात्र, दिनेश व त्यांचा मित्र अनिल भदाणे हे वाढदिवसाची चर्चा करत असताना पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा या पैशांनी कुणाचे आयुष्य बदलून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता येईल का हा विचार करत असतांना अपंग मुले डोळ्यासमोर आली. नोव्हेंबर महिन्यात मुलांचे अपंगत्व दूर करण्यासाठी अपंग कल्याण केंद्रामार्फत मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला हातभार लागावा म्हणून वाढदिवसावर खर्च होणारी पन्नास हजार रुपयांची रक्कम अपंग कल्याण केंद्राला मदत म्हणून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दिनेशचे वडील बाजीराव पगार , आई जिजाबाई, बंधू नितीन यांच्या हस्ते ही रक्कम केंद्राचे व्यवस्थापक ए. यू . धोंडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. केंद्राचे अध्यक्ष डॉ. सतीश लुंकड यांनी आभार मानले आहेत. सून, येत्या महिन्यात होणाऱ्या शस्त्रक्रिया शिबिराचा ज्या अपंगाना लाभ घ्यायचा असेल अशांनी सटाणा येथील अपंग कल्याण केंद्राशी संपर्क साधून नावाची नोंद करावी असे आवाहन ही त्यांनी केले.
..तर आमच्याही मुलाचा जीव गेला असता
By admin | Published: October 31, 2014 11:40 PM