लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : देशातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी नाशिक जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते अॅड. भगीरथ शिंदे यांची निवड करण्यात आली. अॅड. शिंदे यांच्या रूपाने रयत शिक्षण संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी विराजमान होण्याचा बहुमान नाशिक जिल्ह्याला प्रथमच मिळाला आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे मॅनेजिंग कौंसिलची (संचालक मंडळाची) पहिली बैठक पार पडली. त्यात चेअरमनपदी डॉ. अनिल पाटील तर व्हाईस चेअरमनपदी अॅड. भगीरथ शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेच्या ५८ महाविद्यालयांपैकी एकही महाविद्यालय नाशिक येथे नाही. तसेच संस्थेच्या जवळपास ६७५ शाखांपैकी जिल्"ात केवळ २२ शाखा असतांना अॅड. शिंदे यांच्या रुपाने संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. अॅड. शिंदे यांचा प्रशासनावर असलेला वकूब, अभ्यासूवृत्ती, स्पष्ट व स्वच्छ भूमिका यामुळे त्यांची एकमताने व्हाईस चेअरमनपदी वर्णी लावण्यात आली. बैठकीस ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, पतंगराव कदम, दिलीप वळसेपाटील, गणपतराव देशमुख, रामशेठ ठाकूर, अजीत पवार, बबनराव पाचपुते यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेच्या व्हा. चेअरमनपदी भगीरथ शिंदे
By admin | Published: May 26, 2017 12:49 AM