नाशिक : घोटी-सिन्नर मार्गावर पिंपळगाव मोर शिवारात रविवारी (दि.५) पहाटेच्या सुमारास सिन्नरहून घोटीकडे भरधाव वेगाने जाणारी पिकअप गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने उलटली. मात्र, या पिकअपमध्ये चोरट्या पद्धतीने गोमांसची वाहतूक होत असल्याचे समोर आले असून, आतील गोमांस झाकण्यासाठी वर टमाट्याने भरलेल्या जाळ्या वापरल्याचे उघडकीस आले.
दरम्यान, पिकअप गाडीमध्ये अजून एक संशयास्पद अतिरिक्त नंबर प्लेट आढळून आल्याने संशय आणखी बळावला आहे. सदर घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांनी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर घोटी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.सिन्नर-घोटी महामार्गावर पिंपळगाव मोरनजीक सिन्नरहून घोटीकडे भरधाव वेगाने गोमांस व टमाट्याची वाहतूक करत असताना पिकअप (एम.एच.१४, जी.डी. ४८५२) गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. या गाडीमध्ये वरच्या बाजूस टमाटा तर खालच्या बाजूला गोमांस असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर माजी सरपंच धनराज बेंडकोळी यांनी पोलीसपाटील लक्ष्मण काळे यांच्यामार्फत पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा करण्यात आला. सदर पिकअप गाडीमध्ये भाजीपाला वाहन भासविण्यासाठी टमाटा भरलेले होते. पाठीमागे व वरील बाजूस टमाटा भरलेल्या जाळ्या होत्या. तसेच मध्ये प्लायवुडच्या साहाय्याने बंदिस्त केले होते.
विशेष म्हणजे या गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनाचा क्रमांक (एम.एच. १४ जी.डी. ४८५२) असून, गाडीच्या केबिनमध्ये (एम.एच. १४ एच.यू. ६६३२) या आणखी एका नंबरची अतिरिक्त नंबर प्लेट सापडली आहे. अतिरिक्त संशयास्पद नंबर प्लेट सापडल्याने वाहन क्रमांक बदलवून या महामार्गावरून दैनंदिन वाहतूक केली जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास घोटी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.