नाशिक : शिवजयंतीच्या औचित्यावर शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व दुर्गप्रेमी पर्यटक सकाळी दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी गावालगत असलेल्या ‘रामशेज’वर पोहचले. दरम्यान, काही पर्यटकांचा एका झाडाच्या फांदीला धक्का लागला. त्यामुळे फांदीवरील मधमाशांनी आक्रमकरित्या पर्यटकांवर हल्ला चढविल्याची घटना घडली. आशेवाडी गावात समुद्रसपाटीपासून ९८५ मीटर (३२३० फूट) उंचीवर रामशेज हा ऐतिहासिक किल्ला आहे. शहरापासून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर असलेलया अंतरावर असलेल्या हा किल्ला दुर्गप्रेमींचा नेहमीच पसंतीचा राहिला आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने नाशिक सायकलिस्टच्या वतीने नाशिक ते रामशेज अशी सायकल फेरी आयोजित करण्यात आली होती. मानवता हेल्प फाउण्डेशनसह डॉक्टर मित्रांचा समुहदेखील शिवजयंती साजरी करण्यासाठी रामशेजवर गेले होते. यावेळी काही उत्साही तरूण पर्यटक ‘सेल्फी’ घेण्यासाठी एका झाडाजवळ गेले आणि त्यांच्यापैकी एकाचा झाडाच्या फांदीला धक्का लागला. फांदीवर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यामधील सर्व मधमाशा अचानकपणे उठून घोंगावू लागल्याने रामशेजवरून सूटका करुन घेण्यासाठी पर्यटकांनी गावाकडे धाव घेतली. माशांची संख्या जास्त असल्यामुळे भरपूर पर्यटकांना मधमाशांचा डंख सोसावा लागला. यामुळे काही पर्यटकांचे चेहरे, हात, पाय सुजले होते. दरम्यान, मधमाशांची संख्या प्रचंड असल्याने व त्या आक्रमक झाल्याने पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतला.
मधमाशांनी केला दुर्ग पर्यटकांवर हल्ला
By admin | Published: February 20, 2017 12:47 AM