पंचवटी : नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया तसेच स्वाइन फ्लू आजाराचे रुग्ण वाढत चाललेले आहेत. सदर आजार दूर ठेवण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१९मध्ये होणाऱ्या सर्वेक्षणात नाशिक शहराला पहिल्या दहामध्ये आणण्यासाठी मनपाला स्वच्छतेच्या कामात हातभार लावण्यासाठी लोकसहभाग नोंदवून दिंडोरीरोडवरील गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे रविवारी ‘महास्वच्छता’ अभियान लोकसहभागास गोरक्षनगर येथून सुरुवात करण्यात केली. केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत, देशातील स्वच्छ तसेच प्रदूषणमुक्त शहरांसाठी गतवर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये नाशिक शहराचा पहिल्या दहामध्ये क्रमांक आणण्यासाठी मनपातर्फे स्वच्छतेच्या बाबतीत विविध पातळीवर प्रयत्न करण्यात आले होते. गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे गेल्या वर्षभरापासून अनेक स्वच्छता अभियान राबवून या प्रयत्नांमध्ये खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला होता. अपुºया लोकसहभागामुळे यंदा नाशिक शहर स्पर्धेत मागे पडले आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत केवळ मनपावर विसंबून न राहता स्वच्छता अभियानात नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावत अभियानामध्ये सामील व्हावे यासाठी अभियान सुरू केले आहे. यावेळी आमदार बाळासाहेब सानप यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास त्याचे फायदे व परिसरातील विविध विकासकामांची माहिती दिली. डॉक्टरांनी डेंग्यू, मलेरियापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय दखल घ्यावी याबाबत सूचना केल्या. यावेळी झालेल्या स्वच्छता अभियान मोहिमेला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, डॉ. रविकिरण निकम, डॉ. साकले डॉ. तोरणे, डॉ. देशपांडे, डॉ. जायभावे उपस्थित होते. संपूर्ण गोरक्षनगरवासीय महिला, पुरुष तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व गोरक्षनगर मित्रमंडळाचे सदस्य सहभागी झाले होते.स्वच्छतेतून आरोग्य हा विचार रुजवण्यासाठी सदर उपक्रम गोरक्षनगरवासीयांच्या सहभागाने महिन्यातून किमान एक दिवस सातत्य ठेवून राबविण्यात येणार आहे. हे स्वच्छता अभियान केवळ गोरक्षनगर पुरतेच मर्यादित न ठेवता मंडळाचे कार्यकर्ते परिसरातील विविध भागांत जाऊन स्वच्छता अभियान राबविणार तसेच स्थानिकांना स्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी प्रेरित करणार आहे.- प्रवीण जाधव, अध्यक्ष, गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळ
गोरक्षनगरला ‘महास्वच्छता’ अभियानाची सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:30 AM