स्मार्ट सिटी कंपनीच्या प्रत्येक कामातून वादंगच निर्माण होत आहे. आताही एमजी रोडसारखा चांगला रस्ता फाेडू नये, यासाठी कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी विरोध केला होता, तसेच अत्यंत मजबूत असलेला हा रस्ता फोडूच नये, यासाठी याबाबत सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तथापि, रस्त्याच्या कडेला आधी पावसाळी गटार टाकण्याच्या नावाखाली, तसेच नंतर आता सर्व्हिस लाइन्स टाकण्याच्या नावाखाली रस्ता फोडण्यात येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हा रस्ता गाजत असतानाही स्मार्ट सिटी कंपनीने विरोध न जुमानता महाबळ चौक येथे रस्ता खेादण्यास प्रारंभ केला आहे. केवळ एका बाजूने रस्ता खोदायचे काम असले, तरी त्यामुळे एका बाजूने रस्ता खोदला, तरी तो दुरुस्तच हेाणार नसल्याचा या क्षेत्रातील जाणकारांचा दावा आहे.
गेल्या देान ते तीन दिवसांपासून ‘लाेकमत’च्या वतीने दिल्या जाणाऱ्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. यावेळी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी संपूर्ण रस्ता खोदण्यात येणार नसून, केवळ सर्व्हिस लाइन टाकण्यात येतील, तेच फुटपाथ टाकण्यात येतील, असे सांगितले. त्यामुळे आयुक्तांनी होकार भरल्याचे सांगण्यात आले.
इन्फो...
...तर स्मार्ट सिटी खोदकाम करणार नाही!
एमजी रोड तयार करणारे तत्कालीन ठेकेदार शिवनाथ कडभाणे यांनी हा रस्ता तयार करताना सर्व्हिस लाइनसाठी डक्टची अगोदरच सोय करून ठेवल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली होती. मात्र, महापालिकेकडून तशी माहिती मिळाली नसल्याची माहिती कंपनीचे सीईओ सुमंत मोरे यांनी दिली असून, मंगळवारी तशी माहिती घेण्यात येईल आणि सर्व्हिस लाइन असेल, तर त्यासाठी खाेदकाम केले जाणार नाही, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.