नाशिक : नाशिकच्या अंजली भाटे, श्रद्धा शेतकर, सुषमा पाटील आणि स्वाती बेदमुथा या चार नवचित्रकारांनी चित्रकार सुहास जोशी यांचे शिष्यत्व स्वीकारत एकत्र येऊन विविध लोककला अभ्यासत त्या कुंचल्यातून साकारल्या आहेत. विशेष म्हणजे ‘स्री शक्ती’ हा चित्रांचा विषय आहे. त्याच चित्रांचे ‘अरंगेत्रम’ या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन चित्रकार आनंद सोनार यांच्या हस्ते करण्यात आले.सदर प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकाच्या छंदोमयी दालनात आयोजित करण्यात आले आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महिलांनी चित्रकलेच्या माध्यमासह स्वतंत्रपणे लोककलांचे अध्ययन केले. त्यामध्ये मधुबनी, वारली, ओरिसा पट्टचित्र, मांडणा, हजारीबाघ, फड पेंटिंग, संथल पेंटिंग, गोंड, कालीघाट, गुर्जरी, कर्नाटक लेदरपपेट्री, धुलीशिल्प, कलमकारी, चित्रकथी, पिठोरा चित्र यांचा अभ्यास केला.या चित्रप्रदर्शनात स्री शक्तीचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जसे रामायणात रावण, मंदोदरी आणि सीता यांचे चित्र, चाळिशीनंतर स्रियांचे बदलत असलेले जीवन, राजा जनकला जमीन नांगरताना सापडलेली सीता, भारतीय सण यावर चित्रे रेखाटताना बैलपोळा, दसरा, वारी मधला आनंद आदी आहेत.
नवचित्रकारांच्या चित्रप्रदर्शनास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:31 AM