नाशिक : कळवण व पेठच्या सीमा भागात बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीतील भूगर्भ विभागाच्या शास्त्रज्ञांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून, त्यांनी दळवट परिसरातील भूगर्भ हलाचालींचा अभ्यास सुरू केला आहे. हे पथक पुढील दोन वर्षे नाशकात तळ ठोकणार असून, त्यात परिसरातील भूगर्भातील हालचाली व भूकंपनाची कारण मीमांसा करण्यात येणार आहे. तसेच भूकंपासारख्या आपत्कालीन परिस्थितीत संभाव्य नुकसान टाळण्याठी उपाययोजनेविषयी विशेष कृतिबंध तयार करण्यात येणार आहे.दळवट, जयदर या पेठ तालुक्यांतील गावांबरोबरच कळवण तालुक्यांतील ओतूर, कुंडाणे आदी गावांना गेल्या काही वर्षांपासून भूकंपाचे धक्के बसतात. त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्णाच्या सीमालगतच्या भागांतही अशाचप्रकारच्या सौम्य भूकं पाचे धक्के बसल्याची नोंद झालेली आहे. या धक्क्यांची तीव्रता तीन रिस्टल स्केल आणि त्यापेक्षाही कमी नोंदवली गेली असली तरी भविष्यात याचे भीषण परिणाम समोर येऊ नये यासाठी या भागात भूगर्भ शास्त्रज्ञांचे पथक काम करणार आहे. या भागात भूगर्भातील हालचालींमुळे विहिरींचे पाणी आटणे, घरांना तडे जाण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून होत असतानाच नाशिक शहरालाही गेल्या वर्षभरात भूकंपाचे हलके धक्के बसले होते. त्याचा केंद्रबिंदू नाशिकपासून ३० किलोमीटर अंतरावर दर्शविण्यात आला होता. त्यामुळे नाशिकपासून जवळ असलेल्या या दोन्ही तालुक्यांतील भूगर्भात गंभीर हालचाली होत असल्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून राज्य व केंद्र सरकारला याबाबत माहिती देण्यात आली होती. त्याची दखल घेत भूगर्भ शास्त्रज्ञांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून, या विषयाचा सविस्तर अभ्यास सुरू केला आहे. हे पथक पुढील दोन वर्षे नियमित अभ्यास व सर्वेक्षण करून याविषयीचा शासनाला अहवाल सोपविणार आहे.
भूगर्भ हालचालींच्या अभ्यासास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 1:22 AM