नाशिक- महापालिकेच्या वतीने जन्म मृत्यूचे दाखले देण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. मात्र त्यात आता सुधारणा करण्यात येणार असून नागरीकांनी अर्ज केल्यानंतर दाखले तयार झाले की, ते मेलवर त्याच प्रमाणे व्हॉटस अॅपवर देखील मिळणार आहेत. त्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येणार असून दोन महिन्यात अशाप्रकारे नागरीकांना घरपोच दाखले मिळू शकतील.
राज्यशासनाच्या वतीने सेवा हमी कायदा कायदा करण्यात आला असला तरी त्याचे पालन महापालिका पातळीवर होताना दिसत नाही. महापालिकेत नागरीकांनी दाखला करण्यासाठी अर्ज केल्यानंतर महापालिकेच्या विभागीय कार्यालयातून तो सेवा केंद्राकडे पाठविला जातो. त्यानंतर आठ ते पंधरा दिवसांनी दाखले मिळत असतात. त्यामुळे दाखले कितीही तातडीने लागत असले तरी वेळेत मिळत नाहीत.
महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या पार्श्वभूमीवर कामकाजात सुधारणा करण्याचे ठरविले असून महापालिकेच्या विभागीय कार्यालयात अर्ज करण्याऐवजी सेवा केंद्रात अर्ज करण्याची व्यवस्था असेल. जन्माचे दाखले हॉस्पीटल कडून आॅनलाईन मागविण्यात येतील त्याच प्रमाणे मृत्यूचे दाखले देखील आॅनलॉईन रूग्णालयाकडून येतील आणि त्यामुळे नागरीकांनी अर्ज दिल्यानंतर दाखले त्वरीत मिळण्यास मदत होईल शिवाय नागरीकांकडून अर्जाबरोबरच इ मेल आणि मोबाईल नंबर, व्हॉटस अॅप नंबर घेतल्यानंतर त्यांना दाखले तयार झाल्यानंतर ई मेलवर पाठविले जातील. व्हॉटस अॅपचे सर्व्हर विदेशात असले तरी त्या माध्यमातून अर्जदाराच्या वॉॅटस अॅपवर देखील दाखले पाठविण्याबाबत विचार सुरू आहे.