लोहोणेर : वसाका कारखानाच्या जमीनधारक कामगारांनी गुरु वारी (दि. २०) विविध मागण्यांसाठी देवळा येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत निवेदन स्वीकारले. मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.वसाकाच्या जमीनधारक कामगारांनी मागण्यांसाठी सामाजिक अंतर राखत आपल्या कुटुंबीयांसह उपोषण सुरू केले होते. थकीत वेतनासह कारखाना सुरू करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी प्रमुख मागणी होती. तहसीलदार शेजूळ यांनी कामगारांचे म्हणणे एकून घेत कारखाना भाडेतत्त्वावर चालविणाऱ्या धाराशिव कारखाना प्रशासन, साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक यांना उपोषणकर्त्यांच्या भावना कळविण्याचे आश्वासन दिले. कामगार नेते शशिकांत पवार, वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव, वसंत पगार, आनंदा देवरे, प्रताप देवरे, दादाजी सोनवणे, समाधान निकम, निंबा निकम, भरत पवार, हंसराज पवार, सुधाकर सूर्यवंशी, नानाजी पवार, महेंद्र पवार, पोपट वाघ, दोधा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंडित निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिरसाठ, कृष्णा जाधव आदी उपस्थित होते.
‘वसाका’च्या जमीनधारक कामगारांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 12:03 AM