नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळा प्रकरणी दोषी ठरवून निलंबित करण्यात आलेल्या सहाही तहसीलदारांचे निलंबन मागे घेत राज्य सरकारने त्यांना पुन्हा आहे त्याच जागी पुनर्स्थापना दिली आहे. १९ मे रोजी शासनाने नाशिक, पेठ, दिंडोरी, कळवण, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सातही तहसीलदारांना निलंबित करण्याचे आदेश काढले होते. गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत सुरगाणा तालुक्यातील शासकीय धान्य गुदामात पोहोचविण्यासाठी दिलेल्या सुमारे ३६ हजार क्विंटल धान्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येऊन, विधिमंडळात याबाबत चर्चा झाली त्यावरून तहसीलदारांच्या निलंबनाची घोषणा करण्यात आली होती. या निलंबनाविरोधात तहसीलदारांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. त्यावर सुनावणी होऊन दोन आठवड्यांपूर्वी मॅटने तहसीलदारांवरील कारवाईला स्थगिती देऊन त्यांना पुनर्स्थापना देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयात सातही तहसीलदारांच्या नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले. दुपारनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना हजर होण्याचे आदेश बजावल्यावर सर्वच्या सर्व तहसीलदार मूळ ठिकाणी रुजू झाले आहेत.
तहसीलदारांचे निलंबन मागे
By admin | Published: June 30, 2015 11:38 PM