घोटी : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील घरात बुधवारी दुपारी लष्करी हद्दीतून आणलेल्या गोळ्याची छेडछाड करताना झालेल्या स्फोटात एक जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अजय संजय शिरसाठ असे मृताचे नाव असून, या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावालगतच लष्कराची हद्द असून, तेथे सरावावेळी पडलेले दारूगोळे घरी आणले असल्यामुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज आहे. बुधवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास उत्तम मुठे यांच्या घरात अचानक स्फोटाचा आवाज झाला. स्फोटात मुठे यांच्या घराचे पत्रे हवेत उंच उडून आजूबाजूला पडले. त्यामुळे ग्रामस्थांची भंबेरी उडून अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. अजय शिरसाठ या युवकाने लष्करी हद्दीत जवानांनी सरावासाठी सोडलेल्या एखाद्या गोळ्याचा काही भाग घरी आणला होता. लोखंडी साहित्याच्या सहाय्याने तो गोळ्याची तोडफोड करत असताना त्यातील दारूगोळ्याशी झालेल्या स्पर्शाने स्फोट होऊन त्यात अजय जागीच ठार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्याचा मृतदेह बघून गावकरी घाबरले. जखमी मुठे परिवार जिवाच्या आकांताने मदत मागत होते. या स्फोटामुळे गावातील अनेक घरांना जोरदार हादरे बसले असून अनेक घरांचे कौले, पत्रे फुटले आहेत. ग्रामस्थही अचानक झालेल्या स्फोटामुळे भयभीत झाले आहेत.फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंची तपासणी करण्यासाठी सर्व साहित्य व काही सुटे भाग पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, उपविभागीय पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली.भीषण स्फोट झाल्यानंतर विखुरलेल्या घरगुती साहित्याची पाहणी करतांना अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड. समवेत उपविभागीय पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख. बेलगाव कुºहे गावालगत लष्कराची हद्द असून, हद्दीत सराव चालतो. सरावानंतर पडलेल्या गोळ्याचे साहित्य काही ग्रामस्थ घरी आणतात. यात असलेले तांबे, पितळ, शिसे आदी भंगारात विक्र ी करून ते उदरनिर्वाह करतात. या भागात नागरिकांना प्रवेश नसतो. नियमाचा भंग करणाºयावर लष्करी अधिकारी कठोर कारवाई करतात. मात्र अजय नेमका कधी गेला आणि त्याने हद्दीतून कसे व किती साहित्य आणले याचा तपास पोलीस करत आहेत.
बेलगाव कु-हे येथे लष्करी गोळ्याच्या स्फोटात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 1:30 AM