नाशिक : महापाालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या घंटागाडी ठेक्यासाठी बऱ्याच वादानंतर अखेरीस निविदा मागवण्यात आल्या खऱ्या परंतु त्यांना मिळणारा प्रतिसादही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तीन विभागात जास्त तर तीन विभागात जेमतेम एक ते दोनच निविदा प्राप्त झाल्याने पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या विभागात कमी प्रतिसाद मिळाला, त्या आपसात वाटून घेण्यासाठी सेना- भाजपची अनोखी युती झाल्याची चर्चा होत आहे. पाच वर्षांपूर्वी घंटागाडीचा ठेका १७६ कोटी रुपयांना देण्यात आला होता. आता पाच वर्षे झाल्यानंतर आगामी पाच वर्षांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. पाच वर्षांनंतर या ठेक्याची किंमत साडेतीनशे कोटी रुपयांवर गेल्याने ठेक्यातील उड्डाणांबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या होत्या. त्या आश्चर्यकारकरीत्या मागे घेतल्यानंतर निविदांना मिळणारा प्रतिसादही तसाच आहे. सिडको विभागासाठी सहा, पश्चिमला चार आणि पूर्व विभागात तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत. तर नाशिकरोड विभागासाठी अवघी एक तसेच पंचवटी आणि सातपूर विभागासाठी अवघ्या दोन दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. या ठेक्यासाठी निविदा पूर्व बैठकीस तब्बल १६ ठेकेदार हेाते, मात्र नंतर प्रतिसाद इतका कमी कसा काय आला, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आता कमी प्रतिसाद मिळालेल्या विभागांसाठी फेरनिविदा मागवायच्या की उर्वरित पात्रताधकारांत त्याचे वाटप करायचे, अशाप्रकारच्या शासकीय सूत्रांच्या हालचाली सुरू आहेत.
अत्यल्प निविदांमुळे संशयाची वाजली घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 1:30 AM