नाशिक : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असून जिल्ह्यातील ३३५ कोरोनामुक्त गावांपैकी २०८ शाळांमध्ये सोमवारी (दि. १९) प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा घंटा वाजली आहे. उर्वरित शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू करताना शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून ज्या शिक्षकांची चाचणी झालेली आहे, अशाच शिक्षकांनी पहिल्या दिवसापासून शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापन सुरू केल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी दिली. उर्वरित शिक्षकांच्या चाचण्या व लसीकरण टप्प्या-टप्प्याने झाल्यानंतर अन्य शाळा सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कोरोना स्थिती आणि कोरोनापश्चात आजारांबाबत आढावा घेतल्यानंतर शनिवारी (दि. १७) जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचनांनुसार ग्रामीण भागातील ज्या गावांत मागील एका महिन्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशा गावांतील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली. ती देतानाच जिल्ह्यातील ३३५ कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या गावांमधील २०८ शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार शिक्षण व आरोग्य विभाग, तसेच संबंधित ग्रामपंचायतींच्या मदतीने शाळा स्वच्छता व शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी मास्क, वर्गात विद्यार्थ्यांमधील सुरक्षित अंतर, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच शाळा सुरू करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. तसेच सोमवारपासून सुरू केलेल्या सर्व २०८ शाळांतील शिक्षकांची प्राधान्यक्रमाने आरटीपीसीआर तपासणी करून घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य शासनाच्या सूचनांप्रमाणे दर सोमवारी कोरोनामुक्त गावांची यादी प्रसिद्ध होणार असल्याने पुढील आठवड्यात आणखी काही शाळा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इन्फो-
जिल्ह्यातील कोरोनामुक्त ३३५ गावांतील शाळांमध्ये जवळपास एक लाख ३१ हजार १५९ विद्यार्थी आहेत. त्यापैकी ४२ हजार ८४० विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या पाल्यास शाळेत पाठविण्यासाठी लेखी संमती दिली आहे. त्यामुळे शिक्षण व आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांनुसार स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतींच्या मदतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून शाळा सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.