नाशिक : मार्च २०१९ पासून बंद असलेल्या इयत्ता पहिली ते चौथीच्या अडीच हजार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची बुधवार (दि. १)पासून घंटा वाजणार असून, शिक्षण विभागाने त्यादृष्टीने तयारी पूर्ण केली आहेे. मात्र, कोरोनाचा संभाव्य धोका पाहता, शाळा सुरू करताना शासनाच्या सविस्तर मार्गदर्शनाची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मार्च २०१९ मध्ये सर्व प्रथम शाळा व महाविद्यालये बेमुदत काळासाठी बंद करण्यात आल्या. त्यामुळे कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात रोखण्यास मदत झाली असली तरी, त्यानंतर कोरोनाने सर्वच गावांना विळखा मारला. त्यामुळे शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे वरच्या वर्गात ढकलण्यात आले. गेल्या दीड ते पावणे दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, त्यातही पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले; मात्र पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सोय करणे शक्य नसल्याचे पाहून आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तसेच तिसऱ्या लाटेचीही शक्यता मावळल्याने राज्याच्या टास्क फोर्सने शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे. या संदर्भात शिक्षण विभागाने येत्या १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे अडीच हजार शाळा असून, सुमारे दोन लाखांहून अधिक विद्यार्थी इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. आता १ डिसेंबरपासून पहिली वगळता दुसरी, तिसरी, चौथीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. या संदर्भात गुरुवारी (दि. २५) शालेय शिक्षण मंत्र्यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरसिंग बैठक घेऊन त्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. मात्र, अजूनही कोरोनाचा धोका कायम असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षिततेकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.