नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सेवेत तीन टप्प्यांत सामावून घेण्यासह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी घंटागाडी कामगारांनी महापालिकेवर मोर्चा नेऊन घंटानाद आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन सादर केल्यानंतर आयुक्तांनी काही मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत ८ डिसेंबरनंतर कामगारांसमवेत बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले.नाशिक महानगरपालिका श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली घंटागाडी कर्मचाऱ्यांनी पालिकेवर मोर्चा काढला. शिवाजीरोडवरील डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी केले. राजीव गांधी भवनासमोर मोर्चा आल्यानंतर कामगारांनी घंटानाद करत मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, घंटागाडी कामगारांना तीन टप्प्यांत कायम सेवेत वर्ग करण्याचा प्रस्ताव माजी आयुक्त बी. डी. सानप यांच्या काळात महासभेवर ठेवण्यासंबंधी सूचना करण्यात आली होती; परंतु त्यावर अद्याप कार्यवाही नाही. पालिकेकडे १९८६ पासून कंत्राटी पद्धतीने काम करण्याचा नोंदणी दाखला नाही. त्यामुळे पालिका बेकायदेशीरपणे तथाकथित ठेकेदारी पद्धत राबवत आहे. त्याबाबतही दुर्लक्ष केले जात आहे. कामगारांना थकीत २१ दिवसांच्या भरपगारी रजेचे वेतन, सानुग्रह अनुदानाची निम्मी रक्कम, हजेरीकार्ड, वेतनचिठ्ठी तत्काळ अदा करण्यात यावी व गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीचाही प्रश्न मार्गी लावावा. या आंदोलनात १०० हून अधिक घंटागाडी कामगार सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
घंटागाडी कामगारांचा घंटानाद
By admin | Published: December 04, 2014 12:16 AM