महारोेजगार मेळाव्याला मुदतवाढ
नाशिक: कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत सुरू झालेल्या महारोजगार मेळाव्याला येत्या २० तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मेळाव्यात राज्यभरातून ७६ हजारांवर रिक्त पदे उपलब्ध असून, जिल्ह्यातील चार हजारांवर उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहे.
मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने घोंगडी वाटप
नाशिक : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने साक्षीगणेश मंदिर, भद्रकाली येथे मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ७१ गरीब नागरिकांना घेांगडी वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यकर्ते उपस्थित हाेते.
हवामान बदलाची शक्यता
नाशिक : गेल्या चार दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा होत असल्याने नागरिकांना कडाक्याचा थंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र या वातावरणात बदल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. उद्यापासून वातावरण निवाळणार असल्याची शक्यता आहे.
राजदूत चौकात वाहतूक कोंडी
गंजमाळ : त्र्यंबकरोडवरील हाॅटेल राजदूत येथे उभ्या राहणाऱ्या चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. अनधिकृत पार्किंगमुळे त्र्यंबकरोडने जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. त्यातून वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.
पदपथावर फळ विक्रेत्यांचा ताबा
नाशिकरोड : नाशिकरोड येथील दुर्गा उद्यान येथील पदपथावर फळ विक्रेत्यांनी दुकाने थाटून अतिक्रमण केले आहे. या मुख्य मार्गावर तसेच बिटको रुग्णालयाकडे जाणाऱ्या पदपथावरदेखील फळ तसेच भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने पदपथ नेमका कुणासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विक्रेत्यांना येथील भाजीबाजारात जागा असतानाही विक्रेत्यांनी रस्त्यावर दुकाने थाटली आहेत.