सुरगाणा : तालुक्यातील ड घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या आणि अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभधारकांना हक्काचे घरकूुल मिळावे यासाठी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने सुरगाणा पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात तालुक्यातील तीन ते चार हजार नागरिक सहभागी झाले होते. घरकुलसाठी अपात्र ठरविणाऱ्या १७ जाचक अटी नियमांना हद्दपार करा, तालुक्यातील आदिवासीं जनतेचा वनजमिनीचा हक्क लक्षात घेता स्वतंत्र सातबारा मिळावा, रेशन कार्ड, रेशन धान्य मिळावे, आरोग्य सुविधा चांगली असावी, शेतकऱ्यांच्या विरोधी तीन काळे कायदे रद्द करा, युवकांना रोजगार नोकरी द्या, महिलांच्या आरोग्याविषयी सुरक्षितता द्या आदींसह विविध मागण्या करण्यात आल्या. जाचक अटी रद्द केल्या नाहीत तर येणाऱ्या काळात जिल्हा प्रशासनावर दणका मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा भारताचा लोकशाही वादी युवा महासंघाचे राज्य अध्यक्ष सुनील धानवा यांनी दिला. या वेळी तालुका उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड, सुरगाणा पंचायत समिती सभापती इंद्रजित गावित, महेश टोपले यांच्यासह महासंघाचे सदस्य उपस्थित होते.