लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विविध बँकांतून उचललेल्या कर्जापोटी मनपाकडून दरवर्षी सिकिंग फंडामध्ये दहा कोटी रुपये दरसाल दर शेकडा ६.७० टक्के दराने गुंतवले जात आहेत. परंतु, सदर फंडातील रक्कम कर्ज खात्यात भरली तर मनपाला २.५० टक्के इतके जास्त व्याज मोजावे लागणार नाही. परिणामी, वार्षिक २५ लाख रुपयांची बचत होऊ शकते, अशी सूचना माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.महापालिकेला बॅँक आॅफ महाराष्ट्रने २६० कोटी रुपये कर्ज मंजूर केलेले आहे. त्यापैकी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ९५ कोटी रुपये महापालिकेने उचलले आहे. त्याचा फ्लोटिंग बेस दर जवळपास सुमारे १० टक्के इतका पडतो. तसेच जेएनएनयूआरएम अंतर्गत घरकुल योजनेसाठी हुडकोकडून ९० कोटी रुपये इतके कर्ज मंजूर असून, त्यापैकी महापालिकेने २५ कोटी रुपये कर्ज उचलले आहे. त्यावर अंदाजे ९ टक्के इतके व्याज अदा केले जात आहे. महापालिका अधिनियमानुसार कर्जाच्या परतफेडीसाठी काही रक्कम दरवर्षी बाजूला ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार, महापालिकेने दोन्ही कर्जासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये सिकिंग फंडात दरसाल दरशेकडा ६.७० टक्के दराने बँकेत गुंतवलेली आहे. मनपाला भरावे लागणारे व्याज व सिकिंग फंडातील गुंतवणुकीचे व्याज यामध्ये २.५० टक्के जास्त व्याज कर्जापोटी भरले जात आहे. त्यामुळे सदर रक्कम ही कर्ज खात्यात भरली तर मनपाला वार्षिक २५ लाख रुपये कमी व्याज भरावे लागेल आणि पर्यायाने मनपाचा आर्थिक फायदाच होईल. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बग्गा यांनी सांगितले.
सिकिंग फंडातील रक्कम कर्ज खात्यात भरल्यास फायदा
By admin | Published: June 21, 2017 1:02 AM