मेनरोडवर पार्किंगसाठी अडवणूक
नाशिक : शहरातील मेनरोडवरील बाजारपेठ सर्वात मोठी आणि गजबजलेली बाजारपेठ आहे. अरुंद रस्ते आणि दुकानांसमोर दुकाने असलेल्या या मार्गावरून चालणेही कठीण होते. ज्या दुकानातून खरेदी करायची तेथेच वाहन उभे करू दिले जाते. अन्यथा इतर दुकानदार रस्त्यावरदेखील वाहन थांबू देत नाही. दुकानांसमोरील पार्किंगचा अनधिकृत ताबा दुकानदारांनी घेतला आहे.
दुभाजकातील झाडे सुकली
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील द्वारका के दत्तमंदिरपर्यंत दुभाजकात शेाभिवंत रोपे लावण्यात आलेली होती. परंतु सद्य:स्थितीत ही रोपे सुकली आहेत. मध्यंतरी टँकरने रोपांना पाणी दिले जात होते. आता नियमित पाणी दिले जात नसल्याने रोपे जळालीदेखील आहेत.
आर्टिलरीसमोरील सिग्नल बंद
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील आर्टिलरी सेंटरकडे वळणाऱ्या रत्याच्या दुभाजकावर ब्लिंक होणारा पिवळ्या रंगाचा सिग्नल होता. सध्या या ठिकाणचा सिग्नल काढून टाकण्यात आल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना रस्त्यावरील पंक्चर दिसत नाही.
वास्को चौक सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत
नाशिक: नाशिकरोड येथील वास्को चौकात असलेल्या वाहतूक बेटाची दुरवस्था झाली आहे. गेली अनेक वर्षं येथील वाहतूक बेट सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. यापूर्वी चौकात वाहतूक बेट कारंजाने सुशोभित करण्यात आले होते. आता वाहतूक बेटाची दुरवस्था झाली आहे.
सायबर कॅफेमध्ये गर्दी
नाशिक: सध्या महाविद्यालयीन प्रवेश तसेच विविध प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरले जात असल्याने सायबर कॅफेमध्ये गर्दी होत असल्याचे दिसते. आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी झाली आहे.
खांबावरील विद्युत जाळे धोकादायक
नाशिक : विजेच्या खांबावर असलेल्या विद्युत जाळ्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. सिडको परिसरात घराच्या अगदी लागूनच विजेचे खांब असून या खांबावर वाहिन्यांचे जाळे पसरले आहे. या गुंतागुंतीच्या वाहिन्यांमुळे स्पार्किंग होण्याचे प्रकार घडत असल्याने धोका वाढला आहे.