नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत ईपीडीएस प्रणालीची राज्यात अंमलबजावणी करण्यात आल्याने कोणत्याही शिधापत्रिका-धारकाला हव्या त्या रेशन दुकानातून धान्य घेण्याची मुभा पोर्टेबिलिटीने देण्यात आल्याने त्याचा प्रभावी वापर शिधापत्रिकाधारकांकडून होऊ लागला असून, पंधरा दिवसात सुमारे अकरा हजारांहून अधिक शिधापत्रिकाधारकांनी आपल्याला सोयीच्या रेशन दुकानाची धान्य घेण्यासाठी निवड केल्याचे समोर आले आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने एप्रिल महिन्यापासून राज्यात ईपीडीएस प्रणालीचा सक्तीने वापर सुरू केला आहे. ज्या शिधापत्रिका-धारकाचे आधार क्रमांक नोंद असेल तसेच ज्याचे बोटाचे ठसे पॉस यंत्राशी जुळतील अशा पात्र शिधापत्रिकाधारकांनाच रेशनमधून स्वस्त दरात धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय संपूर्ण प्रणालीच संगणकीय झाल्यामुळे शिधापत्रिकाधारकाला आपल्या हव्या त्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात व पाहिजे त्या रेशन दुकानातून धान्य देण्यासाठी पोर्टेबिलिटीची सुरुवात करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात ६ मेपासून पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार चालू महिन्यात २२ मेपर्यंत जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांतून ३,१७,४४१ शिधापत्रिका-धारकांना धान्याचे वाटप करण्यात आले असून, त्यापैकी ११,०१६ जणांनी पोर्टेबिलिटीने आपल्याला हव्या त्या दुकानातून धान्याची उचल केली आहे. त्यात नाशिक शहरात ३३२६ शिधापात्रिकाधारकांचा समावेश आहे. नाशिक शहरात प्रामुख्याने परभणी, बीड, लातूर तसेच पेठ, सुरगाणा येथील मजुरांचे स्थलांतर झालेले असून, त्यांच्यासाठी पोर्टेबिलिटीची सोय अधिक महत्त्वाची मानली जात आहे.ग्राहकांची पळवापळवीरेशनच्या पोर्टेबिलिटीने आता रेशन दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांची पळवापळवी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने रेशनच्या धान्य विक्रीसाठी कमिशनमध्ये वाढ केल्यामुळे अधिकाधिक रेशनची विक्री करण्यासाठी दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना आमिष दाखविण्याबरोबरच ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, त्यातून ग्राहकांचीच सोय होणार आहे.
रेशनच्या पोर्टेबिलिटीने हजारो ग्राहकांना मिळणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:20 AM