नाशिक : ‘होश वालो को खबर क्या’, ‘हाथ छुटे भी तो’, ‘हजारो ख्वाईशे ऐसी’ या आणि अशा विविध गाण्यांचे सादरीकरण मंगळवारी (दि. १०) ‘कहाँ तुम चले गए’ या कार्यक्रमात करण्यात आले.ज्येष्ठ गझल गायक जगजित सिंग यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त पंचवटी परिसरातील निर्माण उपवन या गृहप्रकल्पाच्या तळघरात या शानदार गझल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायक प्रसाद गोखले आणि वीणा गोखले यांनी जगजित सिंग यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या वैविध्यपूर्ण गीतांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीणा गोखले यांच्या विद्यार्थ्यांनी ‘गाइये गणपती जगवंदन’ ही गणेशवंदना सादर केली. शायर फय्याज फेजी यांची विशेष उपस्थिती लाभलेल्या कार्यक्रमात ‘प्यार का पहेला खत’, ‘में नशे में हूँ’, ‘हाथ छुटे भी तो’, ‘सफर मे धुप’ यांसह विविध गीतांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात अनिल दैठणकर (व्हायोलिन), मोहन उपासनी (बासरी), सतीश पेंडसे (तबला), अभिजीत शर्मा (पक्युर्यशन्स), आशिष ढेकणे (गिटार), अनिल धुमाळ (की बोर्ड) यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन अपर्णा क्षेमकल्याणी यांनी केले. या कार्यक्रमास संगीतकार सुधीर सराफ, हितेश पोद्दार, बाळासाहेब पोटे आदी उपस्थित होते.
झुकी झुकी सी नजर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:40 AM