नाशिक : आनंदवलीतील रमेश मंडलिक (वय ७५) यांची हत्या करण्यासाठी तब्बल ३० लाख आणि १० गुंठे जमिनीच्या प्लॉटची सुपारी देण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या खुनातील मुख्य आरोपी गणेश भाऊसाहेब काळे व त्याचे साथीदारांना पोलीसांनी अटक केली असून, रमी राजपूत व जगदीश मंडलिक यांचा पोलीस अजूनही शोध घेत आहे. दरम्यान, जमिनीच्या वादातून झालेला हा प्रकार काँट्रॅक्ट किलिंगचा प्रकार असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या लवकरच मुसक्या आवळण्यात येतील, असा विश्वास पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे, पोलिसांच्या तपासात वेगवेगळ्या संशयितांनी बैठका घेऊन खुनाचा कट रचला असल्याची माहिती समोर आल्याने, या प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्षष्ट केले.
पोलिसांनी या प्रकरणात परिस्थितीजन्य पुरावा व फिर्यादी, मयत व आरोपी यांचे प्रापर्टीबाबत वादाशी संबंधित शास्त्रोक्त तपासाच्या आधारे, तसेच पोलीस कोठडीत आरोपीच्या चौकशीचे आधारे भगवान बाळू चांगले याने गणेश भाऊसाहेब काळे याचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्या चौकशीच्या आधारे गणेश काळे यास प्राथमिक चौकशीनंतर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने, गणेश काळेला बुधवारी (दि.२४)अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या चौकशीवरून खून करणारा आरोपी गणेश काळे व त्याला साथ देणारा भगवान चांगले याच्याकडून गुन्ह्यातील हत्यारासह महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहे. या दोन्ही आरोपींना खून करण्यासाठी सुपारी दिल्याबाबत सचिन त्रंबक मंडलिक, अक्षय उर्फ अतुल जयराम मंडलिक, नितीन पोपट खैरे, सागर ठाकरे यांनी कबुली दिली असून, त्यांनी रचलेला कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार व खुनाची सुपारीबाबत मुख्य सूत्रधार शोधण्यासाठी अटकेतील आरोपी बाळासाहेब कोल्हे व आबा भडांगे यांच्याकडून रम्मी राजपूत, जगदीश मंडलिक याच्याबाबत चौकशी सुरू आहे.
इन्फो-
अटक आरोपींना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
रमेश मंडलीक हत्याप्रकरणात रमेश मंडलिक खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण १२ आरोपींना अटक केली असून, यात सचिन त्र्यंबक मंडलिक अक्षय उर्फ अतुल जयराम मंडलिक, भूषण भीमराज मोटकरी, सोमनाथ काशीनाथ मंडलिक, दत्तात्रय काशीनाथ मंडलिक, नितीन पोपट खैरे, आबासाहेब पाराजी भंडागे, भगवान बाळू चांगले, बाळासाहेब बारकु कोल्हे, गणेश भाऊसाहेब काळे, वैभव अनिल वराडे, सागर शिवाजी ठाकरे अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.