नाशिक : शहरात सर्रासपणे ‘टी-२० विश्वचषक’ सामन्यांवर सट्टेबाजांकडून सट्टा, जुगार खेळविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलिसांनी उपनगर परिसरात कारवाई करत दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या. एका दुचाकीवर बसून मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा साखळी सामना बघत त्यावर दोघांकडून सट्टा खेळला जात होता. गुन्हे शाखेच्या युनिट-२ ला मिळालेल्या माहितीवरून पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
टी-२० विश्वचषक मालिकेचा सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये ज्वर चढलेला असून या मालिकेत होणारे साखळी सामन्यांचा एकीकडे क्रिकेटप्रेमी आनंद लुटत असताना दुसरीकडे मात्र सट्टेबाजांकडूनही या सामन्यांमधील प्रतिस्पर्धी संघांच्या कामगिरीवर ‘सट्टा’ लावत डाव रंगविल्याचे कारवाईत उघड झाले आहे. गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक अभिजित सोनवणे, उपनिरीक्षक विजय लोंढे, पोपट कारवाळ, सहायक उपनिरीक्षक शाम भोसले यांच्या पथकाने हवालदार देवकिसन गायकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील सुराणा चौकात संशयित वसीम रशीद शेख (४०, रा. गाडेकर मळा, देवळाली गाव) आणि अमोल शिवाजी नागरे (३२, रा. दत्तनगर, पंचवटी) यांना सट्टा खेळताना रंगेहात ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता संशयित विजय नंदवाणी याच्या सांगण्यावरून कमिशन घेऊन क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करत असल्याचे तपासात दोघांनी कबुली दिली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्याकडून ३ लाख ४८ हजार रुपयांची रोकड, दोन दुचाकी, एक नोंदवही असा ५ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.