नाशिक - विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना राज्यातील राजकारणाला रंग चढू लागले आहेत. महाजनादेश यात्रेतून मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे यांना आम्ही कुठलीही वॉशिंग पावडर वापरत नाही, आमच्याकडे विकासाचं डॅशिंग रसायन आहे असा टोला लगावला होता त्यावर आज नाशिकमध्ये सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं आहे. मी एक सायन्स स्टुंडट असल्याने सांगू शकते की सगळीच रसायने चांगली नसतात. हा रसायनाचा विकास आहे, रसायनातून काही गोष्टी नष्टही होतात त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या रसायनापासून सावध राहा, हे रसायन घातक आहे असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.
नाशिकमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपाकडे अशी कसली वॉशिंग पावडर आहे, जो आमच्याकडे आहे त्याच्यावर आरोप होतात अन् भाजपात गेल्यावर साफ होतात. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्यांच्याकडे डॅशिंग रसायन आहे. रसायनाच्या कारखान्यात जाता तेव्हा काळजी घ्यावी लागते. त्यामुळे रसायनाचा विकास तुम्हाला हवाय की, आम्ही केलेला विकास हवा आहे असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला.
तसेच मुख्यमंत्री सांगतात की, त्यांनी रोजगार उपलब्ध केले आहेत. या रसायन विकासामुळे नाशिकमध्ये 10 हजार नोकऱ्या गेल्यात. काही रसायन धोकादायक असतात. त्यामुळे ज्यांच्या नोकऱ्या गेल्यात त्यांचे बायोडाटा आम्हाला द्या, सगळे बायोडाटा मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे नोकऱ्या असतील तर आम्ही बायोडाटा पाठवतो, आमच्या मुलांना नोकऱ्या द्या असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
दरम्यान पक्ष बदलणाऱ्या नेत्यांनाही सुप्रिया सुळे यांनी चपराक दिली. प्रत्येकाच्या आयुष्यात उतार-चढाव होत असतो. 15 वर्षे आम्ही सत्तेत होतो. आज अनेकजण सोडून जात आहेत. पक्ष बदलणं म्हणजे मोबाईलची स्कीम बदलण्यासारखं झालं आहे. रिजेक्ट मालाचं पॅकेज बदललं म्हणून तुम्ही घेणार का? सत्ताधारी आरोपाचं राजकारण करतात. निवडणूक आली तर आरोप सुरू होतात. जे नेते लाडके असतात त्यांच्यावर आरोप होतात. हेच त्यांचे राजकारण आहे मात्र आरोपाचं खोट राजकारण आम्ही करत नाही. आम्ही राजकारण सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी करतो, आरोपांसाठी करत नाही असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. तसेच जाणाऱ्यांनी कुठे जायचं त्यांचा विषय मात्र रसायनामुळे तुमचं काही होईल हे सांगता येणार नाही असा टोला लगावला.