नाशिक : राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रविकास कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील भगूर नगरपालिकेला दहा लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.राज्याच्या अल्पसंख्याक विभागामार्फत सन २००८-०९ या वर्षापासून अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रांकरिता क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यात येतो. सन २०१४-१५ या वर्षात अनुदान मिळण्यासाठी राज्यातील विविध महानगरपालिका, नगरपालिकांकडून शासनाने प्रस्ताव मागितले होते. त्यानुसार प्रस्तावांची छाननी करण्यात येऊन क्षेत्रविकास कार्यक्रमांसाठी दोन कोटी ८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील भगूर पालिकेला १० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे. या अनुदानातून भगूर येथील वॉर्ड नंबर ४ मध्ये आरीफ मनियार ते फिरोज अयुब खान यांच्या घरापर्यंत पाईप गटार व रस्ता कॉँक्रिटीकरण तसेच वॉर्ड नंबर ४ मध्येच मोहम्मद सलिम शेख ते आसिफ सुलेमान शेख यांच्या घरापर्यंत पाईप गटार व रस्ता कॉँक्रिटीकरण केले जाणार आहे. सदर अनुदान जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले जाणार असून, भगूर नगरपालिकेने सहा महिन्यांच्या कालावधीत प्रस्तावित नमूद केलेली कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. शासनाने याबरोबरच रत्नागिरी, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, नांदेड, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांतील नगरपालिकांनाही अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यात अमरावती महापालिकेचाही समावेश आहे.
अल्पसंख्याक बहुल क्षेत्रविकास कामांसाठी भगूरला निधी
By admin | Published: January 26, 2015 12:40 AM