नाशिक : अपघातग्रस्त कामगारांना न्याय द्या, कुशल कामगारांप्रमाणे किमान पगार द्या, कायद्यानुसार बोनस द्या, अपघातानंतर जायबंदीची स्थिती समजून काम द्या, अपघातग्रस्तांना बेरोजगार करू नका, अशा एक ना अनेक मागण्यांसाठी औद्योगिक वसाहतींमधील अपघातग्रस्त जायबंदी कामगार एकवटले. कामगारांनी कामगार उपआयुक्त कार्यालयापुढे मंगळवारी (दि.१०) ‘भीक मांगो’ आंदोलन केले.औद्योगिक क्षेत्रात काम करताना अपघात होऊन जायबंदी झालेल्या कामगारांवर विविध प्रकारे अन्याय केला जात असल्याने सर्व कामगारांनी एकत्र येत अपघातग्रस्त कामगार संघटना स्थापन केली. या संघटनेच्या वतीने अध्यक्ष कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली भीक मांगो आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते. दिवसभर कामगार उपआयुक्तांच्या कार्यालयापुढे आंदोलन सुरू होते. संध्याकाळी उपआयुक्तांना संघटनेच्या वतीने शिष्टमंडळाने भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. अपघातावेळी औद्योगिक वसाहतींमधील बहुतांश कंपन्यांनी कमी पगार कागदोपत्री दाखविल्यामुळे पेन्शनही कमी लागू झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तरी हा कर्मचाºयांवर एकप्रकारे अन्याय असून, त्यांना किमान वेतनानुसार पेन्शन द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जायबंदी झालेल्या कामगारांना एकप्रकारे अपंगत्वच आल्यामुळे त्यांना अपंग बांधवांना मिळणाºया सुविधांचा लाभ द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी समाधान हिरे, पंकज बैरागी, कृष्णा सागुते, चंद्रशेखर सोनवणे यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अपघातग्रस्त कामगारांचे ‘भीक मांगो’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:41 AM