बागलाण तालुक्यातील मुळाणे आणि भाक्षी ग्रुप ग्रामपंचायत होती. त्यानंतर १९९३ मध्ये भाक्षी ग्रामपंचायत स्वतंत्र अस्तित्वात आली. स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्याने गावातील एका दहा बाय दहाच्या खोलीत पंचायतीचा कारभार सुरू झाला. कालांतराने ही खोली मोडकळीस आल्याने फुले नगर नववसाहतीत जनसुविधा योजनेतून बांधण्यात आलेल्या समाजमंदिरात ग्रामपंचायत कार्यालय थाटले आहे. शासनाने गावातील गरीब व आदिवासी समाजाच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी सोयी-सुविधा व्हाव्यात, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाज मंदिर उभारण्याची संकल्पना पुढे आली असताना भाक्षीच्या गावगाडा चालविणाऱ्या कारभाऱ्यांनी ग्रामपंचायत इमारत नसल्याने समाज मंदिराचा उपयोग सुरू केला आहे. यामुळे गरीब लोकांची हेळसांड होताना दिसत असून, याला उदासीन शासन जबाबदार असल्याचे बाेलले जात आहे.
मुळाणे-भाक्षी या दोन गावांमिळून ग्रुप ग्रामपंचायत होती. त्यानंतर १५ मे १९९३ रोजी भाक्षी ग्रामपंचायत अस्तित्वात आली. सुमारे दहा हजारांहून अधिकची लोकसंख्या असलेल्या गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ४ हजार ४९७ इतकी आहे. तर आजच्या घडीला मतदार संख्या ही २०११च्या जनगणनेनुसार असलेल्या जनगणनेच्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे सरासरी लोकसंख्या दहा हजाराहून अधिक आहे. भाक्षीकडे निमशहर म्हणून बघितले जात असले तरी विकासाच्या दृष्टीने आर्थिक स्रोत मात्र निर्माण करता आलेले नाही. त्यामुळे घरपट्टी व नळपट्टी व्यतिरिक्त उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे हा परिसर विकासापासून लांबच राहिला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामपंचायत इमारतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा प्रस्ताव सादर केले; मात्र उदासीन प्रशासनामुळे प्रस्ताव अद्यापही बासनातच आहेत. त्यामुळे आजही भाक्षी गाव ग्रामपंचायत इमारतीच्या प्रतीक्षेत आहे.