नाशिक : भाक्षी ता. बागलाण येथील जवान स्वप्नील रौंदळ यांचा उधमपूर येथे प्रशिक्षणादरम्यान बंकरमध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्वप्नीलच्या निधनाचे वृत्त मंगळवारी (दि.१३) गावात येऊन धडकल्यानंतर एकाही घरावर गुढी उभारली गेली नाही. या घटनेने आख्खे गाव शोकसागरात बुडाले आहे.स्वप्नील रौंदळ हा चार वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाला होता. २०१६ मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून स्वप्नील देशसेवेसाठी सज्ज होता. त्यास पहिली पोस्टिंग राजस्थान येथे मिळाली होती. त्यानंतर नुकतीच त्यांची पोस्टिंग उधमपूर येथे झाली होती. याठिकाणी त्यांचे अंतर्गत प्रशिक्षण सुरू असताना मंगळवारी (दि.१३) पहाटे बंकरमध्ये आग लागली. या आगीत चार जवान होरपळून गंभीर जखमी झाले.
त्यात स्वप्नील नव्वद टक्के भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वप्नील यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. स्वप्नील रौंदळ यांचे प्राथमिक शिक्षण भाक्षी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले होते. तर ५ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण सटाणा येथील मराठा हायस्कूलमध्ये झाले होते.
दरम्यान, गुढीपाडव्याची गावात सर्वत्र तयारी सुरू असताना स्वप्नीलच्या निधनाचे वृत्त गावात येऊन धडकले. त्यामुळे गावात एकाही घरावर गुढ्या उभारल्या गेल्या नाहीत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.