नाशिक : इगतपुरी वनपरिक्षेत्रामधील भंडारदरा रस्त्यावरील खेड गावापासून जवळच असलेल्या मौजे काननवाडी येथे एका बिबट्याने संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घराजवळून तीन वर्षीय मुलीला तिच्याआईच्या डोळ्यांदेखत उचलून फरफटत जंगलाकडे ओढत नेल्याची घटना मंगळवारी (दि.२२) घडली. दरम्यान, जिल्हा शासकिय रुग्णालयात बुधवारी दुपारच्या सुमारास गौरी गुरुनाथ खडके हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.भंडारदरा रस्त्यावरील काननवाडी गावातील गट क्रमांक २५३मध्ये राहणाऱ्या खडके कुटुंबियांच्या घरासमोर मंगळवारी संध्याकाळी बिबट्याने येत तिच्या आईशेजारी बसलेल्या गौरीवर झडप घातली. चिमुकलीला जबड्यात उचलून बिबट्याने जंगलाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी घरातील अन्य सदस्यांनी आरडाओरड करत हातात लाठ-काठ्या, बॅटरी घेत बिबट्यामागे धाव घेतली. यामुळे त्याने चिमुकलीला निम्म्या रस्त्यात जबड्यातून सोडून देत जंगलात धूम ठोकली. या हल्ल्यात गौरी गंभीररित्या जखमी झाली होती. घटनेची माहिती गावकऱ्यांकडून वनविभागाला मिळताच इगतपुरी वनविभागाचे प्रभारी वनक्षेत्रपाल महेंद्र पाटील हे वनकर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, जखमी गौरीला घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने पुढील उपचाराकरिता जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविले. दरम्यान, रात्रभर या भागात वन कर्मचारी गस्तीवर होते. तसेच सकाळी काननवाडी येथे पिंजराही तैनात करण्याच्य हालचाली सुरु करण्यात आल्या होत्या. उपचार सुरु असताना रुग्णालयात दुपारी दीड वाजेच्या सुमारास गौरीला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.-बिबट्यांचा मुक्त संचारभंडारदराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या परिसर डोंगरदऱ्या, घाटमार्गाचा असून या भागात कुठे मध्यम तर कुठे विरळ स्वरुपाचे जंगल आहे. या भागात बिबट्यांचा संचार मागील काही महिन्यांपासून वाढला असून बिबटे लहान मुलांवर हल्ले करु लागल्याने रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या भागात पिंजऱ्यांची संख्या वाढवून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
भंडारदरा : तीन वर्षाच्या बालिकेला घराच्या दारासमोरुन बिबट्याने उचलले; गंभीर जखमी झाल्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 3:25 PM
खडके कुटुंबियांच्या घरासमोर मंगळवारी संध्याकाळी बिबट्याने येत तिच्या आईशेजारी बसलेल्या गौरीवर झडप घातली. चिमुकलीला जबड्यात उचलून बिबट्याने जंगलाच्या दिशेने धाव घेतली
ठळक मुद्देभंडारदरा रस्त्यावरील काननवाडीत दुर्घटनाबिबट्यांचा मुक्त संचार