लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील आडवाडीच्या सरपंचपदी अलका हनुमंत भनगिर यांची तर उपसरपंचदी अनिता संजय बिन्नर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आडवाडी ग्रामपंचायतीच्या सात जागांपैकी सहा जागा बिनविरोध निवडण्यात आल्या होत्या. एका जागेसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे गटाने आपले वर्चस्व कायम राखले. सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ए. बी. वार्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा पार पडली. यावेळी सरपंच, उपसरपंच पदासाठी निर्धारित वेळेत दोनच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुपारी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक खैरनार यांनी काम पाहिले. मथुरा बिन्नर, उज्ज्वला ठोंबरे हे सदस्य सभेसाठी उपस्थित होते तर तीन सदस्य गैरहजर होते. सरपंच व उपसरपंचांची निवड जाहीर होताच पॅनलचे नेतृत्व करणारे राजाराम बिन्नर, देवराम बिन्नर, भाऊसाहेब बिन्नर, शांताराम बिन्नर, संजय बिन्नर, हनुमंत भनगिर, अशोक ठोंबरे, सुरेश बिन्नर, कचरु बिन्नर, शिवाजी बिन्नर यांच्यासह ग्रामस्थांनी जल्लोष केला.
===Photopath===
280221\28nsk_5_28022021_13.jpg
===Caption===
आडवाडीच्या सरपंच, उपसरपंचांची निवडणूक बिनविरोध होताच जल्लोष करतांना ग्रामस्थ .