नाशिक : देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल- डिझेलच्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेससह देशभरातील सुमारे २० राजकीय पक्ष व संघटनांनी सोमवारी (दि.१०) केलेल्या ‘भारत बंद’चा फटका नाशिकच्या बाजारपेठेलाही मोठ्या प्रमाणात बसला. नाशिक शहरासह उपनगरांमध्येही दुपारपर्यंत कडकडीट बंद पाळण्यात आल्याने जवळपास ५० टक्के उलाढाल ढप्प झाली. नाशिकमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, सराफ बाजार, रविवार कारंजा, शालिमार परिसरात बाजारपेठेला काँग्रेसच्या बंदचा फटका बसला. त्याचप्रमाणे उपनगरांमध्येही अनेक दुकाने बंद राहिल्याने शहरातील जवळपास अडीचशे ते तीनशे कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज आर्थिक विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला असताना नागरिकांनी मखर सजावटीसह पूजेच्या साहित्याची खरेदी सुरू केलेली आहे. परंतु, सकाळपासूनच दळवणळाची साधने उपलब्ध नसल्याने बाजारपेठेत ग्राहकांचा ओघही ओसरल्याचे दिसून आले. त्यामुळे काही दुकानदारांनी सकाळपासून दुकाने उघडी ठेवूनही त्यांना ग्राहकच नसल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला. परंतु दुपारनंतर व्यवहार सुरू झाल्याने नाशिककरांनी सायंकाळी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढल्याने बाजारपेठेत व्यवहार सुरळीत झाले. मात्र अनेक ग्राहकांनी बंदमध्ये बाहेर पडण्याऐवजी आजची खरेदी उद्यावर ढकलल्याने अनेक व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली.सराफ बाजाराला ३० टक्के फटकाभारत बंदचा सराफ बाजाराला जवळपास २५ ते ३० टक्के फटका बसल्याचे दिसून आले. सराफ बाजारातील अनेक व्यावसायिकांनी दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवली. त्यानंतरही ग्राहकांचा ओघ नेहमीसारखा नसल्याने सराफ बाजारातही नेहमीच्या तुलनेत शांतता दिसून आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण गणपतीसाठी सोने-चांदीचे मोदक, दुर्वाहार यांससह पूजेचे साहित्य खरेदी करीत असतात. परंतु, भारत बंदमुळे ग्राहकच नसल्याने नेहमीच्या तुलनेत ३० टक्के उलाढाल ठप्प झाल्याचे दिसून आले.किरकोळ बाजारही प्रभावित‘भारत बंद’चा सर्वाधिक प्रभाव किरकोळ बाजारावर दिसून आला. बंददरम्यान मालवाहतूक आणि व्यावसायिक गोदामे खुली होती. त्यामुळे घाऊक व्यापारावर बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. परंतु, किरकोळ विक्रेत्यांना बंदमुळे दुपारपर्यंत दुकाने बंद करावी लागली, दुपारनंतर दुकाने उघडूनही नेहमीच्या तुलनेत ग्राहकांचा ओघ नसल्याने किरकोळ बाजारावर बंदमुळे सर्वाधिक झाल्याचे दिसून आले.
‘भारत बंद’चा नाशिकच्या बाजारपेठेला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 1:25 AM