नाशिक : मुस्लीम धर्मीयांसाठी काम करणारे मौलाना सज्जाद नोमानी यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौलाना सज्जाद नोमानी हे गेल्या अनेक वर्षांपासून देशात एकता व अखंडता कायम ठेवण्यासाठी काम करीत असून, बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाच्या देशपातळीवरील आंदोलनात ते वेळोवेळी सहभागी झालेले आहेत. अशा परिस्थितीत हैदराबाद येथे एका कार्यक्रमात मौलाना नोमानी यांच्या एका वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून वसीम रिझवी याने काही विशिष्ट व्यक्तींच्या सांगण्यावरून मौलाना नोमानी यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. या आंदोलनात अक्षय अहिरे, सलीम सिद्दिकी, धीरण दाणी, आसिफ शेख, शिवराज जाचक, रचना साळुंके, अपेक्षा लोंढे, सागर माळवे आदी सहभागी झाले होते.वसीम रिझवी हा काही असामाजिक तत्त्वांसाठी काम करीत असून, त्यामागे मोठे षडयंत्र आहे. त्यामुळे मौलाना नोमानी यांच्या विरोधात दाखल असलेला देशद्रोहाचा गुन्हा मागे घेण्यात यावा व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणाºया वसीम रिझवी याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात यावा, मुस्लिमांना धमकाविल्याप्रकरणी श्री श्री रविशंकर यांच्यावरही गुन्हा दाखल करावा आदी मागण्या त्यात करण्यात आल्या आहेत.
भारत मुक्ती मोर्चाचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:55 AM