नाशिकरोड : इटलीच्या जेसोलो प्रांतातील टाऊन होस्ट येथे झालेल्या वर्ल्ड कप आॅफ फोकलोर स्पर्धेमध्ये नाशिकरोडच्या नृत्याली भरतनाट्यम अकादमीच्या विद्यार्थिनींनी अटकेपार भारताचा तिरंगा फडकवत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे.संस्कृतीची आदानप्रदान व्हावे यासाठी इटलीच्या जेसोलो प्रांतातील टाऊन होस्ट येथे १६ ते २० मे दरम्यान वर्ल्ड कप आॅफ फोकलोर (जागतिक लोककला चषक) ही लोकनृत्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत भारतासह जगभरातील एकूण २१ संघांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक देशाने त्यांच्या लोककला सादर केल्या. या स्पर्धेत भारतातील मुंबई आणि नाशिकरोड ईगल बॅडमिंटन हॉल येथील नृत्याली भरतनाट्यम अकादमी असे दोन संघ सहभागी झाले होते.स्पर्धेत नृत्याली अकादमीच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम नृत्याच्या माध्यमातून विविध लोककला सादर करत भारतीय परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडविले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीच्या संस्थापिका सोनाली करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी ‘स्त्री अन् पुरूष : एक समानता’ हे भरतनाट्यम नृत्याच्या माध्यमातुन सादर केले. या नृत्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर होताच विद्यार्थिनींनी ‘इंडिया.. इंडिया..’च्या घोषणा देत तिरंगा फडकवत जोरदार जल्लोष केला. या स्पर्धेते प्रिया करंदीकर हीने इंग्रजीमधुन या नृत्याची संकल्पना मांडली. यामध्ये ऋचा बापट, सिद्धी होनराव, सायली काडडी, कनक राहुल राठी, हार्दिका देवेंद्र बागुल, नेहा पाटील, पलक अमित राठी, ऐश्वर्या अफजलपुरकर, तनिशा पोरजे या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.या स्पर्धेसाठी गेल्या तीन महिन्यापासून दिवस-रात्र सर्व विद्यार्थिनी अथक परिश्रम घेत होत्या. स्पर्धेत सहभागी होतांना संकल्पना, संरचना, डान्स परफॉर्मन्स, सराव याच्यावर विशेष लक्ष देऊन शिवशक्ती संकल्पनेवर आधारित भरतनाट्यम नृत्य सादर केले. आमचे नृत्य सादर झाल्यानंतर अनेक परदेशी पाहुण्यांनी माझी व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. स्पर्धेच्या निकालाच्या वेळी ‘फर्स्ट गो टू प्राइज टू इंडिया नृत्याली भरतनाट्यम अकादमी’ असे जाहीर होताच पारितोषिक स्वीकारतांना भारताचा तिरंगा फडकविण्याचा अभिमान वाटला़- सोनाली करंदीकर, संस्थापिका, नृत्याली भरतनाट्यम अकादमी
भरतनाट्यमच्या विद्यार्थिनींनी इटलीत फडकविला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:54 AM