नाशिक : केंद्रात आणि राज्यात भागीदार असलेल्या शिवसेनेशी युती करणार नाही, अशी अगोदरच घोषणा करणाऱ्या नाशिक भाजपाने आपल्या मित्रपक्षाला एकटे पाडण्याची तयारी केली आहे. सोमवारी मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रिपाइंसह सरकारातील घटक पक्षांशी चर्चा करा, असे निर्देश दिले असून त्यानुसार आता मंगळवार किंवा बुधवारी चर्चा करण्यात येणार आहे. राज्यात भाजपा आणि शिवसेना युतीसाठी चर्चा सुरू असताना नाशिकमध्ये मात्र भाजपा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी युती होणार नाही, भाजपा स्वबळावर चर्चा करणार, असे सांगितले होते. गेल्या वेळी भाजपा आणि शिवसेना स्वबळावर होते, परंतु महापालिकेच्या शेवटच्या कारकिर्दीत एकत्र झाले होते, असे असताना शिवसेनेकडून यंदा प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा करीत भाजपाने ‘एकला चलो चा नारा’ दिला. शिवसेनेशी नाळ तोडल्यानंतर मात्र भाजपाने रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी भाजपाशी चर्चा करण्याची तयारी केली होती. त्यानुसार मंगळवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे आता भाजपा-रिपाइंशी चर्चा करणार आहेच, परंतु सरकारातील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासपसह अन्य पक्षांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी भाजपाच्या छाननी समितीची बैठक होणार असून, त्यात इच्छुकांच्या मतदार यादीवर अंतिम हात फिरवला जाणार आहे.
शिवसेनेला एकाकी पाडण्याचा भारतीय जनता पार्टीचा डाव
By admin | Published: January 24, 2017 12:35 AM