सिडको : येथील दत्त चौक परिसरातील डेअरीमधून दूध घेऊन घराकडे परतत असताना पादचारी महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीस्वार पसार झाला. रविवारी (दि. १०) भरदुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी चोरट्यांनी दहशत माजविल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दत्त चौकाकडून तेजस्विनी झोडगे (रा. दत्त चौक) या डेअरीमधून दूध घेऊन आपल्या घराकडे पायी जात होत्या. यावेळी पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या मोपेड दुचाकीने आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. यानंतर झोडगे यांनी आरडाओरड करताच परिसरात नागरिक जमा झाले. त्यानंतर तत्काळ पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. झोडगे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झोडगे यांनी रामनवमीच्या मुहूर्तावर सकाळी अकरा वाजता येथील एका सराफ व्यावसायिकाकडून सोने खरेदी केले होते. यानंतर तब्बल दोन ते अडीच तासांनी त्या घराबाहेर पडताच त्यांच्या अंगावरील सोनसाखळीवर चोरट्याने डल्ला मारल्याचे त्यांनी सांगितले.